तेहरान,
us and israel गत पाच महिन्यांपासून इस्रायल ज्यांना मृत मानत होते, ते जनरल अहमद वाहिदी अचानक इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या शवपेटीजवळ दिसले़ जनरल अहमद वाहिदी हे इराणचे सर्वात शक्तिशाली जनरल आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे सरसेनापती आहेत. इस्रायली माध्यमांनी त्यांच्या मृत्यूचा वारंवार दावा केला होता. ८ जूनला इस्रायली वृत्तपत्रांनीही जनरल अहमद वाहिदी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. तथापि, शुक्रवारी तेहरानमध्ये दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना ते अचानक जगासमोर प्रकट झाले.
इराणच्या सरकारी माध्यमांनी जनरल अहमद वाहिदी खामेनी यांच्या अंत्यविधीसंदर्भातील बैठकीला उपस्थित राहताना आणि नंतर त्यांच्या शवपेटीजवळ बसलेले दाखवणारे फोटो प्रसिद्ध केले आहेत. इराणच्या धार्मिक नेतृत्वाने गुरुवारी रात्री तेहरानच्या मध्यवर्ती भागातील सर्वोच्च नेत्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानाजवळ त्यांच्यासाठी एक छाेटी प्रार्थना सभा आयोजित केली होती. तज्ञांच्या मते, अमेरिकेसोबतचे युद्ध कायमस्वरूपी संपवण्यासाठीच्या वाटाघाटींमध्ये इराणची कठोर भूमिका निश्चित करण्यात वाहिदी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ते इराणचे नवीन सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांच्या थेट संपर्कात असलेल्या एका गटाचा भाग असल्याचे मानले जाते.
वाहिदी इराणचे सर्वात शक्तिशाली लष्करी कमांडर
जनरल अहमद वाहिदी यांना इराणचे सर्वात शक्तिशाली लष्करी कमांडर मानले जाते. १ मार्चला त्यांची इराणच्या सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली लष्करी शाखा, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचे नवीन सरसेनापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. इराणमध्ये आयआरजीसी ही पारंपरिक सैन्यापेक्षा अधिक शक्तिशाली मानली जाते. वाहिदी या संपूर्ण संघटनेचे प्रमुख आहेत. वाहिदी हे त्यांच्या पूर्वसुरींपेक्षा अधिक आक्रमक आणि क्रूर आहेत. ते इराणच्या कुख्यात कुड्स फोर्सचे पहिले कमांडर होते़ ज्याचे नेतृत्व नंतर जनरल कासिम सुलेमानी यांनी केले. या काळात त्यांनी मध्य-पूर्वेत इराण-समर्थक सशस्त्र गटांचे जाळे स्थापन केले.