तेहरान,
General Vahidi spotted in Tehran इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यविधीच्या तयारीदरम्यान इराणच्या निमलष्करी ‘रिव्होल्यूशनरी गार्ड’चे प्रभावशाली कमांडर जनरल अहमद वाहिदी अनेक महिन्यांनंतर प्रथमच सार्वजनिकरित्या दिसले आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये वाहिदी हे अंत्यविधीशी संबंधित बैठकीत सहभागी झाल्याचे दिसून आले. गुरुवारी रात्री तेहरानमधील खामेनी यांच्या पूर्वीच्या निवासस्थानाजवळ आयोजित शोकसभेतही जनरल वाहिदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ते खामेनी यांच्या शवपेटीजवळ बसलेले दिसले. त्यांच्या या उपस्थितीमुळे इराणच्या सत्ताकेंद्रातील घडामोडींना नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.
वृत्तानुसार, जनरल अहमद वाहिदी हे सध्या इराणच्या धोरणात्मक गटातील प्रमुख सदस्यांपैकी एक आहेत. अमेरिकेसोबतच्या संभाव्य वाटाघाटींमध्ये इराणची भूमिका निश्चित करण्यात त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो. तसेच, इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांच्याशी थेट संपर्क असलेल्या मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. जनरल वाहिदी हे ८ फेब्रुवारीनंतर प्रथमच सार्वजनिकरित्या दिसल्याचे समोर आले आहे. इराणमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी अनेक आठवड्यांपासून ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाकडे राजकीय आणि लष्करी वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.इराणच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये तेहरानमधील खामेनी यांच्या हुसैनीया संकुलाजवळ मोठी शोकसभा आयोजित करण्यात आल्याचे दिसते. अंत्यविधीदरम्यान अली खामेनेई यांचे पार्थिव व्यासपीठावर ठेवलेल्या शवपेटीत ठेवण्यात आले होते. शवपेटीसमोर लाल रंगाची ट्यूलिपची फुले सजवण्यात आली होती, तर सभागृहात शोकमय वातावरण होते. शोकसभेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
विशेषतः अलीकडील युद्धात प्रियजन गमावलेल्या कुटुंबीयांची उपस्थिती लक्षणीय होती. श्रद्धांजली वाहताना अनेकांनी शवपेटीच्या दिशेने स्कार्फ आणि इतर वस्तू अर्पण केल्या. इराणमध्ये ही आदर व्यक्त करण्याची पारंपरिक धार्मिक प्रथा मानली जाते. नंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये खामेनेई यांची शवपेटी लाल ध्वजाने झाकलेली दिसली. या ध्वजावर पांढऱ्या अक्षरांत “या हुसेन” असे लिहिलेले होते. शिया समाजात हा वाक्प्रचार इमाम हुसेन यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ विशेष महत्त्वाचा मानला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यविधीला शनिवारी सुरुवात होणार असून हा कार्यक्रम अनेक दिवस चालणार आहे. त्यांचे पार्थिव इराणमधील विविध शहरांसह शेजारील इराकमध्येही नेण्यात येणार आहे. अंत्ययात्रा तेहरानच्या ग्रँड मसल्ला येथून सुरू होईल. प्रशासनाने शहरातील अनेक प्रमुख रस्ते बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.