देवळी,
Gram Rozgar Assistant देवळी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत ग्राम रोजगार सहाय्यक जीवन चिव्हाणे यांनी दोन ठेकेदारांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार गटविकास अधिकारी देवळी व पोलिस ठाण्यात केली केली आहे.तक्रारीनुसार, ३० जून रोजी दुपारी पंचायत समितीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विभागात ऑनलाइन हजेरीचे काम करीत असताना मातोश्री पांदण रस्त्याच्या कामाचे ठेकेदार अमित डडगाल व तुषार वाघ तेथे आले. मजुरांची पूर्ण हजेरी का लावली नाही, असे विचारत त्यांनी ग्राम रोजगार सहाय्यक जीवन चिव्हाणे यांचा कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनास्थळी उपस्थित कर्मचारी व इतरांनी मध्यस्थी करून वाद शांत केला. या प्रकारामुळे आपण भयभीत झाल्याचे तक्रारदाराने नमूद केले असून संबंधित ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी देवळी पोलिसांकडे तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.