नवी दिल्ली
ayodhya donation case अयोध्येतील श्रीरामलल्ला मंदिरातील दानपेट्यांमधून रक्कम चोरी झाल्याच्या घटनेने संपूर्ण समाज आणि रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत आणि आम्ही सर्व या घटनेने अत्यंत दु:खी झालो आहोत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून दोषींना कठोर शिक्षा होणे अत्यावश्यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
ayodhya donation case सरकार्यवाह यांनी जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, पिढ्यान्पिढ्यांचा संघर्ष आणि कोट्यवधी रामभक्तांचे समर्पण आणि बलिदानानंतर श्रीरामजन्मभूमीवर बांधलेले भव्य मंदिर संपूर्ण हिंदू समाजासाठी आदर, श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र बनले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त मंडळाच्या निवेदनानंतर उत्तरप्रदेश सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना करून त्यानुसार कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. तपासात जे दोषी आढळतील त्यांना कठोर शिक्षा होईल, हे निश्चित करणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, श्रीराम मंदिरावर कोट्यवधी रामभक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. ही श्रद्धा आणि आस्था कायम राहण्यासाठी विश्वस्त मंडळाने घडलेल्या निंदनीय प्रकारावर कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अशा प्रकाराला असाधारण घटना मानून त्यासंदर्भात योग्य ती कारवाई व्हावी, अशी स्वाभाविक अपेक्षा राष्ट—ीय स्वयंसेवक संघ आणि संपूर्ण हिंदू समाजाला विश्वस्त मंडळाकडून आहे. वर्तमानातील भ्रम आणि अनिश्चिततेची स्थिती संपुष्टात आलीच पाहिजे. प्रभावी व्यवस्थापन आणि पारदर्शक प्रणालीद्वारे श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त मंडळ नक्कीच हिंदू समाजाची श्रद्धा अधिक दृढ करतील, असा विश्वासही सरकार्यवाह होसबळे यांनी व्यक्त केला.
धैर्य आणि संयम दाखवावा
या कठीण काळात संयम आणि धैर्य दाखवित या दुर्दैवी घटनेचा फायदा घेत हिंदू धर्म आणि समाजाला बदनाम करण्याच्या हिंदूविरोधी आणि राष्ट—विरोधी शक्तींचे कट उधळून लावावेत, असे आवाहन राष्ट—ीय स्वयंसेवक संघ संपूर्ण हिंदूू समाजाला करीत आहे, असेही होसबळे म्हणाले.