गोंदिया,
Heavy Rain जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात मागील 24 तासात 82.7 मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस गोरेगाव 119.7 मिमी, आमगाव 116.5, सालेकसा 104.6 व गोंदिया 98.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील बबई-कमरगाव मार्गावरील नाल्याला पूर आल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला गाहे.
जुन महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाची संसतधार कायम आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले असताना छोट्या नाल्यांना पूर आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने रात्रभर चांगलेच झोडपून काढले. यात हवामान खात्याने घेतलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात गोंदिया तालुक्यात 98.8 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली असून आमगाव 116.5 मिमी., तिरोडा 39.8 मिमी., गोरेगाव 119.7 मिमी., सालेकसा 104.6 मिमी., देवरी 64.2 मिमी., अर्जुनी मोरगाव 68.2 मिमी. तर सडक अर्जुनी तालुक्यात 59.2 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील आठ पैकी पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असली तरी जिल्ह्यात 82.7 मिमी सरासरी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे. विशेषतः संततधार झालेल्या पावसामुळे नदी नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गोरेगाव तालुक्यातील बबई - कमरगाव मार्गावरील बबई नाल्याला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या दोन्ही गावाचा संपर्क तुटल्याचे दिसून आले. त्यातच गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर येथील कुबेर कॉम्प्लेक्स मध्ये पाणी शिरल्याने तेथील 20 ते 25 दुकानांचे नुकसान झाले तर ढाकणी येथील कालागोटा चौकीजवळील रेल्वेच्या अंडरग्राउंड मार्ग पाण्याखाली आल्याने कार अडकल्याची माहिती समोर आली असून ढाकणी, चुटिया, मुंडीपार तसेच गोंदिया शहराशी जोडणारा महत्त्वाचा संपर्क मार्ग दुपारपर्यंत बंद असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात भात लागवडीच्या कामांना वेग...
गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. परिणामी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. अशातच गोंदिया जिल्ह्याचा मुख्य पीक असलेल्या भात पिकाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र शेतकरी भात पीक लागवडीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत.