एचएसआरपी नसणाऱ्या वाहनांवर धडाक्यात कारवाई सुरु

शहरातील निम्म्या वाहनांना नवी नंबर प्लेट नाही

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
आरटीओ-पोलिसांचा कारवाईचा धडाका

अनिल कांबळे



नागपूर,

HSRP राज्यातील प्रत्येक वाहनांला एचएसआरपी म्हणजेच नवीन नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. १ जुलैपासून शहरात वाहतूक पोलिस आणि आरटीओ विभागाकडून संयुक्तरित्या कारवाईचा धडाका सुरु आहे. मात्र, शहरातील जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त वाहनांना नवीन नंबर प्लेट लागलेली नाही. त्यामुळे पोलिस आणि आरटीओच्या कारवाईमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जनभावना लक्षात न घेता होत असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात वाहनचालकांमध्ये तारांबळ उडाली आहे.
 
 

HSRP Crackdown in Nagpur: RTO and Traffic Police Begin Action Against Vehicles Without High Security Number Plates 
राज्यातील सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले असून मंगळवारपासून एचएसआरपी नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिस आणि आरटीओ विभागाच्या वतीने रस्त्यावर धावणाऱ्या एचएसआरपी नसणाऱ्या वाहनाच्या चालकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. आरटीओ विभागाचे कर्मचारी थेट ग्रामीण भागात जाऊन शेतकरी, शेतमजूर किंवा किरकोळ साहित्य विक्री करणाऱ्यांना धारेवर धरुन दंड वसूल करीत आहेत. तसेच शहर आरटीओ विभागातील अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा कोणत्याही रस्त्यावर उभे राहून कारवाईचा धडाका लावत आहेत. पोलिस आणि आरटीओच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एक हजार रुपये दंडाचा फटका बसणाऱ्या वाहनचालकांमध्ये कारवाईबाबत रोष व्यक्त केल्या जात आहे. अनेकांनी या कारवाईला विरोध केला असून शहरामध्ये नाराजीचा सूर आहे. दोन्ही परिवहन कार्यालयांतील आकडेवारीनुसार, शहरातील ४ लाख ८६ हजार ८५५ वाहनांवर अद्यापही नवीन नंबर प्लेट बसविण्यात आली नाही. त्यामुळे या सर्व वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ विभाग कंबर कसून सज्ज आहे.
 
बुकींगच्या किचकट प्रक्रियेने केला घोळ
 
 
वाहन नोंदणी असलेल्या आरटीओ कार्यालयातूनच एचएसआरपीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करण्यात येते. त्यानंतर स्लॉट बुक केल्या जातो. काही दिवसांनंतर निर्धारित केलेल्या सेंटरवरुन नवीन नंबर प्लेट लावण्यात येते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून बरीच किचकट आहे. त्यामुळे इंटरनेट किंवा ऑनलाईन बुकींग करण्याचे ज्ञान नसणाऱ्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेतमजूर, शेतकरी, खेडेगावात राहणारे सामान्य नागरिकांसह झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे अशिक्षित लोकांसाठी ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया समजण्यापलिकडे असल्यामुळे एचएसआरपी नोंदणीला आतापर्यंत यश आले नाही.
 
 
चालान कारवाईदरम्यान वाद
 
 
आरटीओ आणि पोलिस HSRP विभागाकडून होत असलेल्या एचएसआरपी कारवाईला नागरिकांकडून विरोध होत आहे. अनेक वाहनचालक पोलिस आणि आरटीओशी वाद घालत आहेत. एक हजार रुपये दंड असल्यामुळे सामान्य नागरिकांची तारांबळ उडत आहे. वाहनाचे कागद कागदपत्र आणि नंबर असूनही विनाकारण कारवाई करीत असल्याची भावना निर्माण झाली असून त्यातूनच वाद-विवाद वाढत असल्याचे प्रकार समोर येत आहे.
राज्य शासनाकडून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिस आणि आरटीओ विभाग दंडात्मक कारवाई करीत आहोत. यापूर्वी सहा वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही वाहनचालकांनी गांभीर्य न दाखविल्यामुळे कारवाई सुरु करण्यात आली आहे.
- किरण बिडकर (आरटीओ, नागपूर)