रस्ता नाही तर बस नाही, अन् शाळाही नाही!

जयपूर येथील विद्यार्थी बसस्थानकावर ताटकळत

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
सेलू
School Transport जयपूर ते सेलू या रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यात आले. परंतु, रस्त्याच्या कडेला मुरमाऐवजी काळी माती टाकण्यात आल्याने रस्त्यावर पुन्हा चिखल तयार झाला आहे. या चिखलाचे कारण देत २ जुलैला गावात बसच आली नाही. परिणामी शाळेच्या दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. विद्यार्थी बसस्थानकावर बसची ताटकळत वाट पाहत उभे होते.१ तारखेपासून शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी आनंदाने शाळेत जाण्यासाठी तयार झाले. अशातच पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक प्रवासांत सवलती दिल्या जातात. पण आजघडीला त्याचे तीनतेरा वाजताना दिसत आहे.
 
 

School Transport 
एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शाळा, विद्यालय, महाविद्यालयात जाण्यासाठी बससेवा सुरू केली. पण, तालुक्यातील जयपूर येथे २ जुलैला शाळेत जाण्यासाठी बस न आल्यामुळे जयपूर येथील विद्यार्थ्यांना बसस्थानकावर ताटकळत बसची वाट पाहावी लागली. परिवहन विभागासोबत संपर्क साधला असता नवीन रस्त्याच्या बाजूला काळी माती टाकल्यामुळे चिखल झालेला आहे. बांधकाम विभागाला वारंवार सूचना देऊनही कंत्राटदाराने मुरूम भरण्याऐवजी रस्त्याच्या कडेला काळी माती भरल्याने बस गावात पोहोचली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले.
 
 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दैनंदिन प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन विषय मार्गी लावावा. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये, अशी मागणी परिरक्षक नितीन फासगे यांनी केली आहे.