नवी दिल्ली,
Karanbir broke Rohit's record टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर राहिलेला नाही. ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा कर्णधार करुणबीर सिंग याने दमदार फलंदाजीच्या जोरावर हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हंगेरीविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ५७ चेंडूंमध्ये १६४ धावांची तुफानी खेळी साकारत टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. २८ जून रोजी झालेल्या या सामन्यात करणबीर सिंगने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याच्या खेळीत १८ चौकार आणि तब्बल १२ षटकारांचा समावेश होता. या खेळीमुळे त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील षटकारांची संख्या २०७ वर पोहोचली आणि त्याने रोहित शर्माचा २०५ षटकारांचा विक्रम मागे टाकला.
रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. १५१ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ३२.०५ च्या सरासरीने ४२३१ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० पेक्षा जास्त षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला होता.मात्र करणबीर सिंगने हा पराक्रम खूपच कमी सामन्यांत केला. त्याने केवळ ६० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ५९ डावांमध्ये ४८.७१ च्या सरासरीने २५३३ धावा केल्या आहेत. या काळात त्याने चार शतके आणि २० अर्धशतके झळकावत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता करणबीर सिंग २०७ षटकारांसह अव्वल स्थानी आहे. रोहित शर्मा २०५ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. मोहम्मद वसीम १९६ षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव १७९ षटकारांसह चौथ्या आणि जोस बटलर १७५ षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, हंगेरीविरुद्धच्या मालिकेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाने आणखी एक मोठा विक्रम केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रियाने २० षटकांत ७ गडी गमावत ३२२ धावांचा डोंगर उभा केला. करणबीर सिंगच्या १६४ धावांव्यतिरिक्त अब्दुल्ला कोतवाल यानेही केवळ २६ चेंडूंमध्ये ९३ धावांची स्फोटक खेळी केली. या धावसंख्येसह ऑस्ट्रियाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. या यादीत Zimbabwe अव्वल स्थानी असून त्यांनी २०२४ मध्ये गाम्बियाविरुद्ध ३४४ धावा केल्या होत्या.