नागभीड,
leopard captured तालुक्यातील कोरंबी येथे गुरूवार, 3 जुलै रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास घरात घुसलेल्या बिबट्याची वनविभागाने सकाळी 11.30 वाजता मुक्तता केली. बिबट्यास निसर्गमुक्त करण्यासाठी वनविभागास तब्बल आठ तास जिकरीचे प्रयत्न करावे लागले. कोरंबी येथे गुरुवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास एक युवक घराबाहेर निघाला. त्यावेळी घरासमोरील गुरांच्या गोठ्यात त्याला एक बिबट्या दिसला. घाबरून त्याने आरडाओरड केली असता, बिबट्याने उडी मारून दुसर्या गोठ्यात प्रवेश केला. दरम्यान, काही वेळातच चांगलीच गर्दी झाली. गोंगाट वाढल्याने बिबट्याने तिथूनही पळ काढत शंकर कोंडू नन्नावरे यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी लोकांनी प्रसंगावधान राखत घर कुलूपबंद केले.

गावकर्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच सहायक उपवनसंरक्षक महेश गायकवाड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांना दिली. गायकवाड आणि बगमारे तातडीने घटनास्थळी पोहचले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पिंजरा लावून घराभोवती बंदोबस्त लावण्यात आला. घरात घुसलेला बिबट्या सहजासहजी पिंजर्यात येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर आरआरटीचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांना पाचारण करण्यात आले. शुटर अजय मराठे यांनी सकाळी 11.30 वाजता या बिबट्यास डॉट करून बेशुध्द केले. त्यानंतर त्यास जेरबंद केले. हा बिबट्या 2 वर्ष वयाचा असून, नर आहे. वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्यास निसर्गमुक्त करण्यात आले.