जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी ‘रेड-ऑरेंज अलर्ट’

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
मुंबई
orange red alert महाराष्ट्रात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. चाकरमान्यांनाही या पावसाचा फटका बसत असून मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवा उशिराने धावत असल्यामुळे कामावर पोहोचण्यात विलंब होत आहे. संध्याकाळी घरी परतताना वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांतील पावसाबाबत विविध भागांसाठी अंदाज आणि इशारे जारी केले आहेत.
 

maharashtra heavy rain orange red alert mumbai pune konkan weather update 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाट परिसरात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या सिमेंट-काँक्रीटच्या ड्रेनेज चॅनेलचे नुकसान झाले असून त्याचा काही भाग कोसळल्यास घाटाखाली वसलेल्या पेढे गावाला धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय घाटाच्या संरक्षणासाठी उभारलेल्या गॅबियन भिंतीखालील मातीही सरकू लागल्याने सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने दुरुस्ती आणि तांत्रिक तपासणी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
भिवंडीत गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवनाचा वेग मंदावला. तीन बत्ती, निजामपूर आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून अनेक गटारे आणि सांडपाणी चेंबर्स ओसंडून वाहू लागल्याने निचरा व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
 
 
दरम्यान, अंधेरी सब-वेही पावसामुळे बंद करण्यात आला आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग रात्रभर झालेल्या पावसामुळे पाण्याने भरला असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. अलीकडेच साकीनाका परिसरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने संवेदनशील भागांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पालघर जिल्ह्यातही पावसाचा फटका बसला असून चहाडे गावातील सज्जनपाडा येथे २८ वर्षीय चंदन किशन वार्ता हा तरुण मासेमारी करत असताना नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि ओढ्यांच्या जवळ न जाण्याचे आवाहन करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
 
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३ जुलै रोजी संपूर्ण कोकण पट्ट्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून रायगड आणि पुणे घाट परिसरात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ४ जुलै रोजी ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसरात ‘रेड अलर्ट’ कायम राहणार असून कोकणातील इतर भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ लागू राहील. ५ जुलै रोजी पुणे घाट क्षेत्रासाठी ‘रेड अलर्ट’ आणि संपूर्ण कोकण विभागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी राहणार आहे. तसेच ९ ते १६ जुलै या कालावधीत राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून जुलैच्या उत्तरार्धात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.