देवळी-पुलगावच्या प्रश्नांवर आ. बकानेंनी वेधले सरकारचे लक्ष

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
देवळी,
Rajesh Bakane पावसाळी अधिवेशनात देवळी मतदारसंघातील पाणी, आरोग्य, रस्ते आणि विकासाशी निगडित मूलभूत प्रश्नांवर आ. राजेश बकाने यांनी आवाज उठवत शासनाचे लक्ष वेधले.
 

MLA Rajesh Bakane Raises Key Issues of Water, Roads and Healthcare in Deoli-Pulgaon Constituency 
मतदारसंघातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी असलेल्या नाचणगाव आणि वायगाव या गावांतील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन या दोन्ही ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची जोरदार मागणी आ. बकाने यांनी केली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पुलगाव येथे स्वतंत्र महिला व शिशु रुग्णालय उभारण्याची तसेच पुलगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, मनुष्यबळ आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
देवळी-पुलगाव मतदारसंघात रस्ता कोणता आणि पांदण कोणती हे ओळखणे कठीण झाले आहे. अनेक प्रमुख व ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मतदारसंघातील सर्व खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी तातडीने मंजूर करण्याची त्यांनी मागणी केली. याचबरोबर आशियाई विकास बँक अंतर्गत सुरू असलेल्या दहेगाव, देवळी, वायगाव,कानगाव कात्री या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामातील कंत्राटदारांच्या निष्काळजी आणि नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला. धुळीचे प्रदूषण, वाहतुकीतील अडथळे, अपूर्ण कामे आणि सुरक्षिततेचा अभाव याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.