वाशीम - मंगरुळनाथ मतदार संघातील पोलिस पाटलांची रिक्त पदे भरा

अधिवेशना आ. खोडे यांनी सरकारचे वेधले लक्ष

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
मंगरूळनाथ,

वाशीम
Shyam Khode मंगरूळनाथ मतदार संघात तब्बल ३७६ पोलिस पाटील पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था, महसूल प्रशासन तसेच गावपातळीवरील शासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा वाशीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.
 
 
MLA Shyam Khode Demands Recruitment for 376 Vacant Police Patil Posts in Washim-Mangrulpir Constituency
दीर्घ काळापासून रखडलेल्या या पदभरतीचा प्रश्न त्यांनी शासनासमोर ठामपणे मांडत भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली. सभागृहात बोलताना आ.खोडे यांनी सांगितले की, पोलिस पाटील हे गावपातळीवरील प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी व सामाजिक घडामोडींची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविणे, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत शासकीय यंत्रणेला सहकार्य करणे अशा अनेक जबाबदार्‍या पोलिस पाटलांवर असतात.मात्र वाशीम - मंगरूळनाथ मतदार संघात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने ग्रामीण प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रिक्त पोलिस पाटील पदांची भरती तातडीने करून ग्रामीण भागातील प्रशासन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. रिक्त पदे भरल्यास ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, प्रशासनाला स्थानिक पातळीवर प्रभावी सहकार्य मिळेल तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,असेही आ.खोडे यांनी नमूद केले.
 
आ. श्याम खोडे यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे रखडलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून इच्छुक उमेदवार आणि नागरिकांचे आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.