अमरनाथ यात्रेकरूंना मोदींचा खास संदेश

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Modi's message to Amarnath pilgrims पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष पत्र लिहित शुभेच्छा दिल्या असून यात्रेदरम्यान पाच महत्त्वपूर्ण संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. पत्राच्या सुरुवातीलाच त्यांनी “हर हर महादेव! जय बाबा बर्फानी!” असा जयघोष करत सर्व शिवभक्तांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले की, जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रेत सहभागी होणे हे प्रत्येक शिवभक्तासाठी मोठे सौभाग्य आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पहिल्या पूजेसह यात्रेला प्रारंभ होतो आणि दरवर्षी लाखो भाविक या दिव्य यात्रेची आतुरतेने वाट पाहतात. बाबा बर्फानींचे दर्शन ही लाखो श्रद्धाळूंसाठी अत्यंत पवित्र आणि अविस्मरणीय अनुभूती असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 

baba 
 
मोदी यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रा ही भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच जगभरातून विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा जपणारे भाविक महादेवाच्या दर्शनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये एकत्र येतात. ही यात्रा भारताच्या विविधतेतील ऐक्याचे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठीश्री अमरनाथजी तीर्थक्षेत्र मंडळ, जम्मू आणि काश्मीर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे त्यांनी कौतुक केले. भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल, जम्मू-काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, जम्मू-काश्मीर पोलीस, भारत-तिबेट सीमा पोलीस, सीमा सुरक्षा दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
 
यात्रेदरम्यान सेवा देणाऱ्या स्थानिक नागरिकांचे आणि लंगर चालवणाऱ्या स्वयंसेवकांचेही मोदी यांनी कौतुक केले. जम्मू-काश्मीरमधील हजारो स्थानिक नागरिक यात्रेकरूंचे स्वागत करत असल्याचे सांगत त्यांनी या सेवेच्या भावनेला भारतीय संस्कृतीची खरी ओळख म्हटले. यावेळी पंतप्रधानांनी यात्रेकरूंना पाच संकल्प करण्याचे आवाहन केले. त्यामध्ये प्रशासनाचे आदेश, वाहतूक नियम आणि सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला. पावसामुळे निसरडे रस्ते आणि थंडी याबाबत विशेष दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले.तिसऱ्या संकल्पात ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश देत प्रवास खर्चातील किमान १० टक्के रक्कम स्थानिक उत्पादने खरेदीसाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे जम्मू-काश्मीरमधील कुटुंबे आणि युवकांच्या उपजीविकेला बळ मिळेल, असे त्यांनी नमूद केले. चौथ्या संकल्पात रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बंधू किंवा भगिनीला एक रोपटे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ‘आईच्या नावाने एक वृक्ष’ अभियान पुढे नेण्याचा संदेशही त्यांनी दिला.पाचव्या आणि अंतिम संकल्पात वर्षभर ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने आपली कर्तव्ये पार पाडण्याचे आणि विकसित भारताच्या उभारणीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. पत्राच्या शेवटी पंतप्रधान मोदी यांनी बाबा अमरनाथांच्या कृपेने सर्व यात्रेकरूंची यात्रा सुरक्षित, मंगलमय आणि आध्यात्मिक उर्जेने परिपूर्ण होवो, अशी प्रार्थना व्यक्त केली.