तेहरान,
Mojtaba Khamenei absent father funeral इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यविधीसाठी जगभरातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचे पुत्र आणि इराणचे विद्यमान सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतीय प्रतिनिधी अयातुल्ला हकीम इलाही यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मोजतबा खामेनेई यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. इस्रायलकडून सतत वाढत असलेल्या धमक्या आणि त्यांच्यावर ठेवली जात असलेली पाळत यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर मोजतबा खामेनेई यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांनंतर ते सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. वृत्तानुसार, २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यांमध्ये अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी मोजतबा खामेनेई जखमी झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याचा तसेच पायालाही दुखापत झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, इराणने अधिकृतपणे त्यांची प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी मोजतबा खामेनेई यांच्याविरोधात केलेल्या धमकीच्या वक्तव्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात करार आणि चर्चा सुरू असली तरी पश्चिम आशियातील परिस्थिती अजूनही संवेदनशील असल्याचे मानले जात आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांचा अंत्यविधी ४ ते ९ जुलैदरम्यान इराणमधील विविध शहरांमध्ये पार पडणार आहे. ४ आणि ५ जुलै रोजी त्यांचे पार्थिव तेहरानच्या ग्रँड मशिदी कॉम्प्लेक्समध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ६ जुलै रोजी तेहरानमध्ये भव्य अंत्ययात्रा काढण्यात येणार असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ९ जुलै रोजी त्यांच्या जन्मस्थळ मशहद येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.