पत्नीने सुपारी देऊन केला पतीचा खून

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
- पत्नीसह दोघांना अटक : एका लाखात दिली होती सुपारी

अनिल कांबळे
नागपूर, 
Murder case प्रेमविवाह केल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक व शारीरिक त्रस्त करणाऱ्या पतीची पत्नीनेच एका लाखात सुपारी देऊन हत्या घडवून आणली. हे हत्याकांड भांडेवाडीत घडले असून या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह दोघांना अटक केली. तीन आरोपींचा शोध सुरु आहे. गणेश ऊर्फ गुरुदेव प्रितमलाल बोरकर (४५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मनिषा गणेश बोरकर (३७) आणि अभिजीत पुरुषोत्तम साखरे (२९, रा. कन्हान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर अमन कैथवास आणि रोहित बोरकर (कांद्री-कन्हान) यांच्यासह एक अल्पवयीन आरोपी फरार आहेत.
 
 
murder
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा हिचे पहिले लग्न झाले होते. मात्र, पती व्यसनाधीन आणि नेहमी चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असल्यामुळे ती दोन मुलींसह पतीला सोडून माहेरी कन्हानला निघून आली होती. काही महिन्यांनंतर मनिषाची ओळख गणेश बोरकर याच्याशी झाली. दोघांनी कुटुंबियांच्या संमतीने प्रेमविवाह केला. काही वर्षे संसार केल्यानंतर गणेश हा कुख्यात गुन्हेगार असल्याचे तिला कळले. तो मनिषाच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करायला लागला. पतीच्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला मनिषा कंटाळली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी गणेशने पत्नीला मारहाण केली. त्यामुळे ती माहेरी राहायला निघून गेली. ‘तुझा मर्डर करुन टाकतो’ अशी तिने माहेरी जाताना धमकी दिली.
 
 
एका लाखात दिली पतीची सुपारी
आरोपी अभिजीत साखरे, अमन कैथवास आणि रोहित बोरकर यांना मनिषाने एक लाख रुपयांत पतीचा खून करण्यासाठी सुपारी दिली. त्यासाठी ५० हजार रुपये रोख दिली तर ५० हजार काम झाल्यानंतर ठरले. अभिजीत आणि त्याच्या तीन साथिदारांनी भांडेवाडी परिसरात गणेशला गाठून खूून केला आणि पळून गेले. मनिषाने स्वत: रडत रडत पोलिस ठाणे गाठून पतीचा खून झाल्याचा कांगावा केला. मिळालेल्या वेळात सर्व पुरावे नष्ठ करण्याचा प्रयत्न केला.
मुलीवर वाईट नजर
मनिषाला पहिल्या पतीकडून एक १६ वर्षीय मुलगी होती. पती गणेशची त्या मुलीवर नजर होती. त्यामुळे तो वारंवार मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. ही बाब मनिषाने हेरली होती. गणेश याच्यावर ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातून तो डिसेंबर २०२५ मध्ये कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्या विकृत स्वभावामुळे मुलीलासुद्धा धोका निर्माण झाला होता. ही कारवाई पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे, भांडेवाडीचे ठाणेदार नितीन चरडे, राजा टाकळीकर, बावनकर, रुपेश नानवटकर, अनिस खान, नजीर शेख, राजू टाकळकर, प्रमोद बावणे, आशिष पवार आणि लिलाधर यांनी केली.