- तवा डोक्यात घालून केला होता खून
अनिल कांबळे
नागपूर,
Murder of a girlfriend लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या डोक्यात गरम तवा घालून खून करणाऱ्या प्रियकराला मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जाहीद खान याकुब खान (वय ४०, श्रध्दानंद पेठ, बजाजनगर) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्रिया (३५) ही पती व एका विवाहित मुलीसह राहत होती. मात्र, पती तेंदूपत्त्याच्या कामाला दुसऱ्या जिल्ह्यात निघून गेल्यानंतर प्रियाने श्रद्धानंदपेठेतील फुड कोर्टमध्ये नोकरी करणे सुरु केले. बुटी कुटुंबियांनी काही दिवसांतच तिने जाहीद खान याला आपल्या घरी आणले. तो पती असल्याचे तिने ओळख करुन दिली. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहायला लागले. मात्र, १ जून २०२२ मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जाहीदचे प्रियासोबत कडाक्याचे भांडण झाले. त्याने रागाच्या भरात प्रियाच्या डोक्यावर गरम तवा मारला. यामध्ये प्रिया रक्तबंबाळ होऊन खाली पडली. तिला रुग्णालयात दाखल केल्यास जीव वाचू शकला असता. मात्र, जाहीदने तिचा जीव जाईपर्यंत घरातच ठाण मांडले. त्यानंतर तो पळून जाताना शेजाऱ्यांनी त्याला थांबवले. घरात जाऊन बघताच रक्ताचा सडा दिसला. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले आणि जाहीदला पोलिसांच्या ताब्यात दिले. बजाजनगर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन आरोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकारी वकील आसावरी पळसोदकर यांनी बाजू मांडली.
पुरावे आणि साक्षिदारांमुळे शिक्षा
प्रियाचा खून केल्याचे शेजाऱ्यांनी बघितले होते. तसेच परिस्थितीजन्य पुरावेसुद्धा भक्कम होते. साक्षिदारांनी आपल्या जबाबात हत्याकांडाची साक्ष कायम ठेवली. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. आसावरी पळसोदकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने आरोपी जाहीदला जन्मठेप आणि दंड ठोठावला.