Nagpur City Police नागपूर शहर पोलिसांच्या नागरिकाभिमुख उपक्रमांतर्गत परिमंडळ क्र. ३ मधील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हरवलेले १२२ मोबाईल शोधून संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले. मोबाईलमध्ये असलेली महत्त्वाची कागदपत्रे, कौटुंबिक छायाचित्रे, व्हिडिओ आणि अन्य वैयक्तिक माहिती सुरक्षितपणे परत मिळाल्याने नागरिकांनी नागपूर पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक पोलिस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या नेतृत्वाखाली लकडगंज, पाचपावली, शांतिनगर, तहसील, गणेशपेठ आणि कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या मोबाईल हरवल्याच्या तक्रारींची एकत्रित चाळणी करून विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. ठाण्यांतील 'मिसिंग मोबाईल शोध पथकां'नी सीईआयआर प्रणाली, मोबाईल ट्रॅकिंग, तांत्रिक विश्लेषण करीत पाठपुरावा केला. या संयुक्त कारवाईत एकूण १२२ हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले.
मोबाईलची पडताळणी, मालकी हक्काची खात्री आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आयोजित विशेष कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. पाचपावली पोलिसांनी सर्वाधिक ६१ मोबाईल शोधून काढले, तर लकडगंज पोलिसांनी २१ मोबाईल शोधले. उर्वरित मोबाईल इतर पोलिस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नातून शोधण्यात आले. ठाणेदार मुकुंद कवाडे, ठाणेदार अनिरुद्ध पुरी, अतुल तावडे, गजानन तामटे आणि ठाणेदार संजय मेंढे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या मोहिमेत पाचपावली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत गायकवाड, पोलिस अंमलदार आशिष पाटील व प्रकाश सुरजुसे, लकडगंजचे विशाल ठाकरे, शांतिनगरचे आदित्य गोंडाणे व प्रीतम करणे, गणेशपेठच्या महिला पोलिस अंमलदार दिव्यश्री लाडे, तहसीलचे सुमित चौधरी, कोतवालीचे रमण खैरे तसेच डीसीपी झोन-३ सायबरचे महेंद्र सेलूकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.