नवी दिल्ली,
no water for those who support terrorists दहशतवाद्यांना रसद पूरवून भारतावर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांना कदापि पाणी मिळणार नाही. धमक्या दिल्याने भारत घाबरेल आणि सीमापार नद्यांचे पाणी विना अडथळा सोडले जाईल, अशा भ्रमात असणाऱ्यांनी पाणी मिळण्याची आशा सोडून द्यावी. भारतावर हल्ला झाल्यास जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. सिंधू जल करार स्थगित आहे आणि पुढेही स्थगितच राहील, अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले.

अलीकडे सिंधू जल करार आणि सीमापार नद्यांचे पाणी मिळण्यासाठी आकांडतांडव करणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांनी भारताविरोधात गरळ ओकली. पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे नेता बिलावल भुट्टो यांनी पाणी अडविल्यास भारतावरप अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली. त्याला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, भारत धमक्यांना भीक घालत नाही. सिंधू पाणी कराराबाबत भारताची भूमिका कायम आहे. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला सतत पाठिंबा मिळत असल्यामुळे हा करार सध्या स्थगित आहे. जर पाकिस्तानला चर्चा पुढे न्यायची असेल, तर त्यांनी सीमापार दहशतवादाला दिलेला पाठिंबा पूर्णपणे आणि कायमस्वरूपी संपवला पाहिजे. दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्यांना भारताच्या हद्दीतील पाणी कदापि मिळणार नाही. त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्यास भारत प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. भारतात रक्तपात घडवणाऱ्यांनी सिंधू पाणी मिळण्याची आशा सोडून द्यावी. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला दिलेला पाठिंबा विश्वासार्ह आणि ठामपणे थांबवला पाहिजे.
खलाशाच्या मृतदेहाची विटंबना गंभीर बाब
व्हेनेझुएलामध्ये एका भारतीय खलाशाच्या मृतदेहाची कथित विटंबना झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही भारताने केली आहे. जहाजावर मृत्यू पावलेले भारतीय खलाशी राकेश चौहान यांच्या मृतदेहाची छेडछाड आणि अवयव काढल्याची घटना गंभीर आहे. भारताने व्हेनेझुएला सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. आम्ही तेथील सरकारला या प्रकरणाची त्वरित आणि निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती केल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
तिस्ता नदी प्रकल्पावर चर्चेने तो़डगा
तिस्ता नदी प्रकल्पाबाबत जयस्वाल म्हणाले, भारत या मुद्यावर परस्पर सहमतीने, ठरवलेल्या आराखड्याने आणि चर्चेने तोडगा काढण्यास तयार आहे. भारताने तीस्ता नदी प्रकल्पाबाबत आपले मत बांगलादेशला आधीच कळवले आहे. या विषयावर आमचे भविष्यातील धोरण ठरवताना आम्ही सर्व संबंधित बाबी विचारात घेणार आहे. याप्रकरणी तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप अमान्य असल्याचे स्पष्ट करत त्यांनी चीनवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
अफगाणवरील हल्ल्याचा निषेध
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह अनेक नागरिक मारले गेले. अफगाणिस्तानची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाला आमचा खंबीर पाठिंबा आहे. आमची मानवतावादी मदत अफगाणिस्तानला सुरूच राहील, यासंदर्भात इतर देशांनी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही. आम्ही त्यांना औषधी आणि इतर प्रकारची मदत पाठवत राहणार असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.