टोरोंटो,
Portugal's thrilling victory टोरोंटो स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या फिफा विश्वचषक २०२६ च्या ३२ संघांच्या फेरीतील सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियावर २-१ अशी नाट्यमय मात करत १६ संघांच्या फेरीत धडक मारली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पोर्तुगालने संयम राखत अखेर विजय खेचून आणला. दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत पेनल्टीवर गोल केला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, मात्र एकाही संघाला गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत संपला. दुसऱ्या हाफमध्ये क्रोएशियाने आक्रमणाची धार वाढवली आणि ५३ व्या मिनिटाला इव्हान पेरिसिचने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

क्रोएशियाच्या गोलनंतर पोर्तुगालने पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. अखेर ६४ व्या मिनिटाला क्रिस्टियानो रोनाल्डो याने पेनल्टीवर अचूक गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. यानंतर सामना अधिकच चुरशीचा झाला. ८१ व्या मिनिटाला रोनाल्डोला बदली करण्यात आले आणि त्याच्या जागी रुबेन नेवेस मैदानात उतरला. निर्धारित ९० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर अतिरिक्त वेळेत सामन्याचा खरा थरार पाहायला मिळाला. ९० व्या मिनिटाला राफेल लिओने याच्या अप्रतिम क्रॉसवर गोन्कालो रामोस हेडरद्वारे गोल करत पोर्तुगालला २-१ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली.
यानंतर क्रोएशियानेही अखेरच्या क्षणात जोरदार आक्रमण करत गोल केला आणि जल्लोष सुरू केला. मात्र पोर्तुगालने ऑफसाईडसाठी अपील केले. VAR तपासणीनंतर पंचांनी क्रोएशियाचा गोल ऑफसाईड ठरवत रद्द केला. अखेरीस अंतिम शिट्टी वाजताच पोर्तुगालने २-१ असा विजय निश्चित केला. दुसरीकडे, ३२ संघांच्या फेरीतील दुसऱ्या सामन्यात स्पेनने ऑस्ट्रियावर ३-० असा एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत स्थान मिळवले. स्पेनकडून मिकेल ओयार्झाबाल याने शानदार कामगिरी करत ३६ व्या आणि ८९ व्या मिनिटाला दोन गोल केले. तर पेड्रो पोरोने ६६ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत संघाचा विजय भक्कम केला. आता १६ संघांच्या फेरीत फुटबॉलप्रेमींना मोठी लढत पाहायला मिळणार आहे. ७ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता पोर्तुगाल आणि स्पेन आमनेसामने येणार असून या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.