माओवादीविरोधी मोहिमेतील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान

गडचिरोलीतील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
गडचिरोली,
maoist campaign माओवादविरोधी अभियानात धाडस, शौर्य आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचा पिपिंग समारंभ शुक्रवारी मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
 
 
maoist campaign
 
गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील व माओवादग्रस्त जिल्ह्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पित भावनेने कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेत गृह विभागाने ही वेगवर्धित पदोन्नती जाहीर केली आहे. या पदोन्नतीमुळे गडचिरोली पोलीस दलाच्या कार्याचा गौरव झाला असून दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबलही उंचावणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
 
 
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनील बागल आणि राहुल देव्हडे यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्हे लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सर्व पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या.
 
 
समारंभात बोलताना पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी माओवादविरोधी अभियानातील अधिकाऱ्यांच्या धाडसी कार्याचे कौतुक केले. गडचिरोलीसारख्या दुर्गम, प्रतिकूल आणि संवेदनशील भागात कर्तव्य बजावताना आलेले अनुभव, विविध आव्हाने आणि त्यावर मात करत बजावलेल्या सेवेमुळे राज्य पोलीस दलाची प्रतिष्ठा उंचावली असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्कृष्ट कार्याचा सन्मान होत असल्याने पोलीस दलात गुणवत्ता, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेला अधिक बळ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. गडचिरोली पोलीस दलाला आजपर्यंत तीन शौर्यचक्र, सहा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदके, ३३८ पोलीस शौर्य पदके, गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल २० राष्ट्रपती पोलीस पदके, १,५१० पोलीस महासंचालक पदके तसेच एकूण ४०४ अधिकारी व अंमलदारांना वेगवर्धित पदोन्नती मिळाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
 
 
या समारंभाला अपर पोलीस महासंचालक (एटीएस) नवल बजाज, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. निखिल गुप्ता, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, अपर पोलीस महासंचालक (सायबर) यशस्वी यादव, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सागर पाटील, पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते तसेच गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश उपस्थित होते. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनीही पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.