निवृत्तीवर रोनाल्डोने मौन तोडले!

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Ronaldo breaks silence on retirement फिफा विश्वचषक २०२६ दरम्यान ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या निवृत्तीबाबत चर्चांना पुन्हा वेग आला आहे. पोर्तुगालने क्रोएशियावर २-१ असा थरारक विजय मिळवत १६ संघांच्या फेरीत प्रवेश केला असतानाच रोनाल्डोच्या भवितव्याबाबत मोठी चर्चा रंगली. विशेष म्हणजे, या सामन्यात खेळत रोनाल्डोने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. क्रोएशियाविरुद्धच्या बाद फेरीच्या सामन्यात मैदानात उतरताच रोनाल्डो फिफा विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीत खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. ४१ वर्षीय रोनाल्डोने या सामन्यात गोलही केला आणि पोर्तुगालच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
 
Ronaldo
 
दरम्यान, सामन्यापूर्वी रोनाल्डोची बहीण काटिया अवेरो हिने एका मुलाखतीत निवृत्तीबाबत मोठे संकेत दिले. स्पोर्ट्स टीव्हीशी बोलताना तिने दावा केला की, विश्वचषकानंतर रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेऊ शकतो. “तो जोपर्यंत मैदानावर आहे, तोपर्यंत त्याचा खेळ पाहून आनंद घ्या. आज नाही, पण लवकरच तो निर्णय होऊ शकतो,” असे ती म्हणाली. क्रिस्टियानो रोनाल्डो याने २००३ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण केले होते. सहा विश्वचषकांमध्ये खेळणाऱ्या मोजक्या तीन खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. तसेच, सहा वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा तो एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे. त्यामुळे हा विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा ठरणार का, याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.
मात्र, सामन्यानंतर रोनाल्डोने निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने स्पष्ट सांगितले की, सध्या तो निवृत्तीबाबत कोणताही विचार करत नाही. रोनाल्डो म्हणाला, “आत्ता या विषयावर विचार करण्याची वेळ नाही. स्पर्धा संपल्यानंतर मला निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. मी माझ्या कुटुंबाशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईन. त्याने पुढे सांगितले की, तो कोणताही घाईघाईत निर्णय घेणार नाही. “माझ्यासाठी सध्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या संघाला विजय मिळवून देणे. उर्वरित गोष्टींचा विचार नंतर करू, असेही रोनाल्डोने स्पष्ट केले.