- न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी
अनिल कांबळे
नागपूर,
Sakkardara double murder सक्करदरा परिसरातील बहुचर्चित दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार ऋषी पुट्टेवार याला अखेर सक्करदरा पोलिसांनी पुण्यातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ऋषी पुट्टेवार याच्याविरुद्ध यापूर्वी १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
११ जून रोजी सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रघुजीनगर येथील गोंड वस्तीत आदित्य उर्फ सोनू बोडवे आणि दादू उर्फ आदित्य राहाळकर या दोघांची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. हल्ल्यानंतर आरोपींनी दोघांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला होता. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट-५ आणि सक्करदरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून वैभव उर्फ दादू प्रदीपराव डोंगरे (३०), वेदांत उर्फ डब्बा अजय डबीर (२०) आणि अभिषेक उर्फ तात्या उत्तम राऊत (२६) यांना अटक केली होती. मात्र, या कटाचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा ऋषी पुट्टेवार फरार होता. पोलिसांच्या तपासानुसार, ऋषी पुट्टेवारचा परिसरात फळविक्रीचा व्यवसाय असून, त्याच्याशी संबंधित वादातून या दुहेरी हत्येचा कट रचण्यात आला. त्याच्या फळ दुकानात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या बंडू उर्फ अनिल भावटे (६०) याला कामावरून काढून टाकल्यानंतर मृतक आणि आरोपी यांच्यात वाद सुरू झाला होता.
हत्येच्या आदल्या रात्री आदित्य आणि सोनू हे त्यांचा मित्र आकाशसोबत फळ दुकानात जाऊन वैभव डोंगरेला या प्रकरणावरून जाब विचारला होता. दुसऱ्या दिवशी अभिषेक राऊतला कामावर ठेवल्याच्या कारणावरून पुन्हा वाद झाला. त्यानंतर आरोपींनी कट रचून दुकानापासून काही अंतरावर दोन्ही युवकांना अडवले. धारदार शस्त्रांनी वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि नंतर दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपींनी पळून जाण्यासाठी आर्थिक मदत मागितल्याचे समोर आल्यानंतर निरंजन दळवी आणि लोकेश राचलवार यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिन्ही आरोपींना गारगोटी नाल्याजवळून अटक करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी रक्ताने माखलेले कपडे नाल्यात फेकल्याचेही तपासात निष्पन्न झाले. मुख्य आरोपी ऋषी पुट्टेवार आतापर्यंत पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तो पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. नागपुरात आणून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.