सेलू,
sant kejaji maharaj संतवचनांचा जयघोष करीत आषाढी एकादशीच्या वारीसाठी वारकरी मोठ्या उत्साहात सज्ज झाले आहेत. मुखी विठ्ठलनाम, हातात टाळ-चिपळ्या आणि मृदुंगाच्या मंजुळ ध्वनीत वारकरी घोराड येथून पंढरपूरच्या दिशेने रविवारी प्रस्थान करणार आहेत. गेल्या २२ वर्षांपासुन उन्ह, वारा, पाऊस याची तमा न बाळगता विठूरायावर सर्व सोडून हे वारकरी पंढरपूरची वाट धरतात.
वारीदरम्यान ज्ञानोबा-तुकारामचा अखंड जयघोष, अभंग, भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठलभक्तीचा जागर होणार असून आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्याची वारकर्यांची ओढ शिगेला पोहोचली आहे. विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या तीर्थक्षेत्र घोराड येथून २३ वर्षापासून संत केजाजी महाराज यांच्या नावाने दिंडी जात आहे. ही दिंडी घोराड ते आळंदी खाजगी वाहनाने व आळंदी येथुन संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या दिंडीत सहभागी होणार आहे.
रविवारी सकाळी ही दिंडी विठ्ठल रुख्माई देवस्थान येथुन निघणार असून दिंडीचा दिवसभर मुक्काम हा भवानी मंदिरात राहणार आहे. सायंकाळी ४ वाजता दिंडी भजनी मंडळ, भाविकांच्या उपस्थितीत निघणार असून गावाच्या सीमेपर्यंत परंपरेनुसार पायदळ जाणार आहे. तेथून ही दिंडी खाजगी वाहनाने आळंदीकडे प्रस्थान करणार आहे. या दिंडीचे चालक नरेश महाराज गुघाने तर विणेकरी पुरुषोत्तम गुजरकर राहणार असून या दिंडीचे स्थानिक आयोजक बंडू वाघमारे, किशोर माहुरे आहेत.