मुंबई
nabh utaru aala पावसाळा सुरू झाला की अनेकांच्या कल्पनाशक्तीला नवी उभारी मिळते. कुणाला कविता सुचते, कुणाला काहीतरी लिहावंसं वाटतं, तर अनेकजण पावसाच्या सरींमध्ये मनाला भिडणारी गाणी गुणगुणण्यात रमून जातात. पावसात पावसाचीच गाणी ऐकण्याचा आणि गाण्याचा आनंद काहीसा वेगळाच असतो. अशाच भावनेला स्वरबद्ध करत ‘द फॅमिली मॅन’मधील जेके तळपदे या भूमिकेमुळे लोकप्रिय ठरलेला अभिनेता शारिब हाशमी याने आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली आहेत.
दर मंगळवारी ‘Tunes Day’ या संकल्पनेअंतर्गत शारिब हाशमी सोशल मीडियावर विविध गाण्यांचे सादरीकरण करत असतो. यावेळी त्याने पावसाच्या वातावरणाशी सुसंगत असे मराठीतील अजरामर गीत ‘नभ उतरू आलं’ सादर केले. त्याच्या सुरेल आवाजासह घेतलेल्या हरकतींनी नेटकऱ्यांना अक्षरशः भारावून टाकले. अभिनयाबरोबरच शारिबच्या गायनकलेचेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे हे सादरीकरण अनेकांच्या पसंतीस उतरले आहे.
शारिबने सादर केलेले ‘नभ उतरू आलं’ हे गीत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या १९७७ सालच्या ‘जैत रे जैत’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील आहे. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आदिवासी संस्कृती आणि स्थानिक बोलीभाषेचा लहेजा जपत हे गीत लिहिले होते. या गीताला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले असून आशा भोसले यांनी आपल्या स्वरांनी ते अजरामर केले आहे. पडद्यावर स्मिता पाटील यांच्या प्रभावी अभिनयामुळेही हे गीत रसिकांच्या कायम स्मरणात राहिले.
‘नभ उतरू आलं’ हे केवळ nabh utaru aala निसर्गाचे वर्णन करणारे गीत नसून, निसर्गाच्या प्रतिमांमधून व्यक्त झालेली प्रेमभावना आणि विरहाची हळवी व्याकुळता यांचे अत्यंत संवेदनशील चित्रण त्यामध्ये आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच येणारे “नभ उतरू आलं, चिंब थरथर ओलं” हे शब्द आकाशातील काळेभोर ढग जणू जमिनीपर्यंत उतरून आल्याची अनुभूती देतात. पावसाच्या वातावरणात निर्माण झालेली निसर्गाची शिरशिरी ही प्रत्यक्षात नायिकेच्या मनातील भावविश्वाशी जोडली जाते. पावसाचे ढग पाहून तिच्या मनात दाटून आलेल्या प्रेमभावना या गीतातून अत्यंत काव्यमय पद्धतीने व्यक्त होतात. त्यामुळे पावसाळ्याच्या या आल्हाददायक दिवसांत हे गीत पुन्हा एकदा रसिकांना मंत्रमुग्ध करत आहे.