पुलगाव,
Pulgaon Municipal Council नगरपालिकेत आयोजित विशेष सभा सुरू होण्यापूर्वीच ४ सदस्यांनी स्वाक्षरी करणे तसेच १५ सदस्यांनी सभागृहाबाहेर हजेरी पुस्तकात स्वाक्षरी केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. या प्रकरणी आ. राजेश बकाने यांनी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनंतर चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. आता या प्रकरणाचा ३ दिवसांत खुलासा करण्यात यावा तसेच नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठीची शिफारस का करण्यात येऊ नये, असे पत्र मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना २ जुलैला दिले आहे.
पुलगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, नगर परिषद येथे आयोजित विशेष सभेत गैरहजर असूनही बनावट उपस्थिती दाखवणे, शासकीय अभिलेखात फेरफार तसेच आर्थिक व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत आ. राजेश बकाने यांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची चौकशी करण्याकरिता आर्वी न. प.चे मुख्याधिकारी तथा अध्यक्ष चौकशी समिती यांच्याकडे अहवाल सादर करण्याबाबत व चौकशी अहवाल सादर करण्याबाबत कळवले होते. त्या अनुषंगाने आर्वी येथील मुख्याधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला आहे. या अहवालात ६ एप्रिलला आयोजित विशेष सभा नियोजित वेळेत सुरू न होताच सुरुवातीला ४ सदस्यांनी हजेरी पुस्तकावर सभागृहात स्वाक्षरी केल्या. त्यानंतर १४ सदस्य आणि नगराध्यक्ष असे १५ सदस्यांनी सभागृहाबाहेर स्वाक्षरी केल्या. ते नियमानुसार नसल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यानुसार आपणास नगर परिषद अध्यक्ष दूर केले जाण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात का येऊ नये, याबाबतचा खुलासा ३ दिवसांच्या आत सादर करावा. खुलासा सादर न केल्यास किंवा असमाधानकारक खुलासा केल्यास एकतर्फी कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना दिले आहे.
आम्ही खुलासा करू : नगराध्यक्ष
या संदर्भात नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर यांच्यासोबत संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी सभागृहात जे गैरवर्तन केले त्यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे. स्वाक्षरी संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिले आहे. परंतु, आम्ही कोणतेही गैरवर्तन केलेले नाही. आम्ही दोषी नाही. त्यामुळे आम्हाला अपात्र करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राचा सविस्तर खुलासा सादर करणार असल्याचे ब्राह्मणकर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.