नवी दिल्ली,
Sonam's bail upheld मेघालयातील चर्चित राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी सोनम रघुवंशीला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिचा जामीन तत्काळ रद्द करण्यास नकार देत, सध्या दिलासा कायम ठेवला आहे. तसेच मेघालय सरकारच्या याचिकेवर सोनमकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होणार आहे. मेघालय सरकारने सोनम रघुवंशीला जामीन देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि शील नागू यांच्या खंडपीठासमोर ३ जुलै रोजी सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, सुरुवातीला जामिनावर स्थगिती देण्याचा विचार होता. मात्र, सोनम आधीच जामिनावर बाहेर असल्याने तत्काळ आदेश रद्द करणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणावर सविस्तर सुनावणीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही खंडपीठाने सांगितले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान “जामीन हा नियम आहे आणि तुरुंगवास हा अपवाद आहे, या तत्त्वाचाही उल्लेख केला. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असले तरी कायदेशीर प्रक्रियेचे पालन महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
मेघालय सरकारतर्फे बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, हे प्रकरण पूर्वनियोजित हत्येचे असून, पत्नीने पतीला डोंगराळ भागात नेऊन कटात सहभाग घेतला, हत्या केली आणि मृतदेह दरीत फेकून दिला.सरकारच्या बाजूने असेही सांगण्यात आले की, हत्येनंतर सोनम फरार झाली होती आणि नंतर तिला उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण ९४ साक्षीदार असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.सुनावणीदरम्यान अटकेशी संबंधित कागदपत्रांमधील तांत्रिक त्रुटीचाही मुद्दा समोर आला. अटकेच्या दस्तऐवजांमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम १०३(१) ऐवजी चुकून ४०३(१) नमूद करण्यात आले होते. सरकारने याला केवळ टंकलेखनाची चूक असल्याचे सांगितले.