आर्वी,
the rare world of ants राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक मृदुल जाणे या स्टडी ऑन डायव्हर्सिटी ऑफ अँट्स (हायमेनॉप्टेरा: फॉर्मिसिडी) इन डिफरंट साइट्स ऑफ वर्धा डि्ट्रिरक्ट, महाराष्ट्र या विषयावर शिवाजी सायन्स कॉलेज, पावनी येथील प्राणीशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. सीमा कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संशोधन करत आहेत. हे संशोधन सुरू असून त्यादरम्यान मृदुल जाणे, राकेश्वर कपूर, परविंदर सिंह बैदवान आणि डॉ. सीमा कडू यांच्या संयुक्त संशोधनातून लेप्टोजेनिस हिस्टेरिका, पॉलिरॅकिस पंक्टिलाटा आणि पॉलीरॅकिस टिबियालिस या तीन दुर्मिळ मुंगी प्रजातींची महाराष्ट्रातून प्रथमच अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
या प्रजातींचे नमुने वर्धा जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून संकलित करण्यात आले. या संशोधनावर आधारित ॲडिशन्स टू द अँट फॉना ऑफ वर्धा डि्ट्रिरक्ट, महाराष्ट्र, इंडिया (हायमेनॉप्टेरा: फॉर्मिसिडी) हा संशोधन लेख हंगेरी येथून प्रकाशित होणार्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नॅचुरा सोमोजियेन्सिस या संशोधन नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे.
संशोधकांच्या मते, या शोधामुळे महाराष्ट्रातील मुंग्यांच्या जैवविविधतेच्या नोंदीत महत्त्वपूर्ण भर पडली असून राज्यातील कीटकवैविध्याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली आहे. या संशोधनामुळे महाराष्ट्रातील मुंग्यांच्या वितरणासंबंधीची वैज्ञानिक माहिती अधिक समृद्ध झाली असून भविष्यातील जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि कीटकशास्त्रीय संशोधनासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरणार आहे. हंगेरीस्थित आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकामध्ये संशोधन प्रकाशित झाल्याने वर्धा जिल्ह्यातील संशोधनाची जागतिक स्तरावर नोंद झाली आहे.