भारतीय कुटुंबातील तिघांचा अमेरिकेत होरपळून मृत्यू

घराला लागलेली आग, जीव वाचण्यासाठी बाथरूममध्ये लपले

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
indian family die of burns in the us अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्यातील वूस्टर शहरात एका घराला लागलेल्या भीषण आगीत गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भविष्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अवघ्या दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेल्या गुजरातच्या एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा भीषण आगीत करुण अंत झाला. आगीत मृत पावलेल्यांमध्ये गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील नडियाद येथील रहिवासी असलेल्या सुतार कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.
 
 
indian family die of burns in the us
 
आगीच्या ज्वाळांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे कुटुंब बाथरूममध्ये लपून राहिले होते, मात्र तिथे पोहोचलेल्या जीवघेण्या धुरामुळे त्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांची ओळख हितेशभाई सुतार, त्यांची पत्नी हिनाबेन सुतार आणि त्यांची २० वर्षांची मुलगी ईशानी अशी झाली आहे. हितेश हे वूस्टर येथील ‘इकोनो लॉज मोटेल’मध्ये काम करत होते. कामाच्या सुविधेसाठी मोटेल प्रशासनाने त्यांना मोटेलच्या आवारातच राहण्यासाठी खोली दिली होती, जिथे ते आपल्या कुटुंबासह राहत होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास मोटेलमध्ये अचानक भीषण आग लागली. लाकडी बांधकाम आणि वाऱ्यामुळे आग संपूर्ण इमारतीत वेगाने पसरली. हितेशभाई यांच्या खोलीच्या बाहेर आगीच्या ज्वाळा धगधगत असल्याने संपूर्ण कुटुंब खोलीतच अडकले.