अनिल कांबळे
नागपूर,
Two Murder Cases शहरात गेल्या चोवीस तासांत दोन हत्याकांड उघडकीस आले. नवीन कामठीतील पहिल्या घटनेत कौटुंबिक वादातून अज्ञात आरोपीने महिलेचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला तर भांडेवाडीतील दुसऱ्या घटनेत एका कुख्यात गुन्हेगाराचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.
भाग्यश्री राजेंद्र रजक असे मृत महिलेचे नाव आहे. भाग्यश्री या नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. आज रात्री ८.३० वाजताच्या सुमारास गादा-घोरपड रोडवर त्या येत असताना, अज्ञात मारेकऱ्याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की भाग्यश्री यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री यांचे पहिल्या पतीसोबत पटत नसल्याने त्या राजेंद्र रजक नावाच्या व्यक्तीसोबत राहत होत्या. मात्र, राजेंद्रसोबतही त्यांचे वारंवार कडाक्याचे भांडण व्हायचे. राजेंद्र हा दारू पिऊन त्यांना अमानुष मारहाण करायचा. या जाचाला कंटाळून त्या आपल्या पहिल्या पतीच्या दोन मुलांसह दोन महिन्यांपूर्वीच कामठी जवळील ''गादा'' गावात भाड्याच्या खोलीत राहण्यास आल्या होत्या. त्यांच्या बहिणीने त्यांना ही खोली मिळवून दिली होती. भाग्यश्री यांनी राजेंद्रविरुद्ध कामठी पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रारही दाखल केली होती.
दुसऱ्या घटनेत, भांडेवाडीतील हनुमाननगरात राहणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराची अज्ञात आरोपीनी चाकूने भोसकून खून केला. गणेश प्रीतम बोरकर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हे हत्याकांड रात्री साडेनऊ वाजता उघडकीस आले. या प्रकरणी भांडेवाडी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे.