टस्कर हत्तीच्या हल्ल्यात गावकर्‍याचा मृत्यू

सामदा-सोनापूर नागमंदिर जवळील घटना

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्याकडे रवाना झाल्याचा दावा
 
सावली,
villager killed in tusker attack महिनाभरापासून सावली तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या रानटी हत्तींच्या कळपातून वेगळा झालेल्या टस्कर हत्तीने एका गावकर्‍याचा जीव घेतला. हत्तीला पाहून घाबलेला हा व्यक्ती दुचाकी सोडून पळाला होता. मात्र, हत्तीने त्याचा पाठलाग करून त्याला चिरडले. ही घटना गुरुवार रात्री 9.15 वाजताच्या सुमारास व्याहाड-सोनापूर मार्गावर घडली. अतुल गोहने (55, रा. सोनापूर) असे मृतकाचे नाव आहे.
 
 
villager killed
 
व्याहाड उप वनपरिक्षेत्रातील सोनापूर येथील अतुल गोहने हे आणखी दोघांसह दुचाकीने स्वत:च्या गावी सोनापूरकडे जात होते. दरम्यान, व्याहाड-सोनापूर मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक रानटी हत्ती आला. समोर हत्ती दिसताच तिघेही घाबरले आणि जीव वाचविण्यासाठी दुचाकी रस्त्यावरच सोडून पळण्याचा प्रयत्न करू लागले. पळापळीच्या गोंधळात दोघे जण जंगलाच्या दिशेने वेगवेगळ्या बाजूंनी निघून गेले. तर अतुल गोहने अधिकदूरपर्यंत जाऊ शकले नाही. संतप्त हत्तीने त्याचा पाठलाग करून जागीच ठार केले. अन्य दोघांनी कसाबसा जीव वाचवत गाव गाठले आणि हत्तीपासून जीव वाचविण्यासाठी आम्ही पळालो अशी माहिती मृतकाच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी अतुल गोहने यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
 
 
घटनास्थळी शोध घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला अतुल यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. गेल्या काही आठवड्यांपासून सावली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा मुक्त वावर सुरू असून, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र आता हत्तींच्या वाढत्या हालचालींमुळे मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही अनेक गावांमध्ये हत्तींचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्याकडे रवाना झाल्याचा दावा करण्यात येत आहे.