मुंबई
zunjar khashaba स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित ‘खाशाबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, चित्रपटाचे दिग्दर्शन आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर चित्रपटाचे चित्रीकरणही सुरू झाले होते. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आता चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याचबरोबर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘खाशाबा’ हा चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाला आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. मात्र, खाशाबा जाधव यांची मध्यवर्ती भूमिका नेमकी कोण साकारणार, याबाबतचे रहस्य अद्याप कायम आहे. या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच, टीझर पाहिल्यानंतर आदिनाथ कोठारे किंवा ‘फँड्री’ फेम सूरज पवार यांपैकी एखादा अभिनेता ही भूमिका साकारणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे चित्रपटातील प्रमुख भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोण कोण आहे ?
या चित्रपटात महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, वैभव मांगले, छाया कदम, गार्गी कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, ओम भूतकर यांच्यासह स्वतः नागराज मंजुळेही अभिनय करताना दिसणार आहेत. याशिवाय संभाजीराजे छत्रपती यांचीही या चित्रपटात विशेष भूमिका असणार आहे.
खाशाबा दादासाहेब जाधव हे स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे प्रसिद्ध फ्रीस्टाईल कुस्तीपटू होते. सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर येथे त्यांचा जन्म झाला. १९५२ मध्ये फिनलंडमधील हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी कुस्ती प्रकारात कांस्यपदक पटकावत भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा पराक्रम केला. आपल्या चपळाई आणि वेगवान खेळशैलीमुळे त्यांना ‘पॉकेट डायनामो’ या नावानेही ओळखले जात असे.