400 कुटुंबांचे स्थलांतर, घरे-दुकाने पाण्याखाली

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
नाशिक
chandori nashik गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर नाशिकपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील चांदोरी गावाला पुराच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातला. नदीच्या पाण्याने गावात प्रवेश करताच संपूर्ण गावाचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला. रात्रीच्या वेळी अचानक गावात पाणी शिरल्याने एकच खळबळ उडाली आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेतले असून आतापर्यंत जवळपास 400 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली. मात्र, पुराच्या पाण्याच्या वेढ्यामुळे गावातील परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे.
 

400 families shifted as floodwaters submerge homes and shops in chandori nashik 
गावातील अनेक घरांमध्ये चार ते पाच फूट उंचीपर्यंत पाणी शिरले होते, तर संपूर्ण बाजारपेठही पाण्याखाली गेली. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले, याचा अद्याप अंदाज बांधता आलेला नाही. नदीकाठी असलेल्या चांदोरी गावातील खालची आळी परिसरात नागरिकांच्या घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी साचले होते. गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने सर्वच दुकानांमध्ये पाणी घुसले आणि व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पुरामुळे गावातील वीजपुरवठाही रात्रीपासून खंडित झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. तरीही ग्रामस्थांनी धीर न सोडता या संकटाचा सामना केला.
 
 
दरम्यान, चांदोरी आणि सायखेडा chandori nashik  या गावांना जोडणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांमधील संपर्क तुटला होता. नदीने पात्र सोडून थेट गावात प्रवेश केल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीही जलमय झाली आहे. गावातील शाळादेखील पाण्याखाली गेली होती. ज्या नागरिकांची घरे दुमजली होती, त्यांनी दुसऱ्या मजल्यावर आश्रय घेतला, तर अनेक जण घरातील आवश्यक सामान घेऊन गुडघाभर पाण्यातून वाट काढत सुरक्षित स्थळी जाताना दिसत होते. या पुरामुळे गावाचे मोठे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेषतः शेतीचे मोठे नुकसान झाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली, तर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये अडीच ते तीन फूट पाणी शिरल्याने मोठा आर्थिक फटका बसल्याचे सांगितले.सध्या चांदोरी आणि सायखेडा या दोन्ही गावांमध्ये विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली. दोन्ही गावांतील जवळपास 400 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून काही नागरिकांना जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आणि मंदिरांमध्ये निवारा देण्यात आला आहे. तर काही जण आपल्या नातेवाईकांकडे गेले आहेत. पुरामुळे गावाचा पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्यासाठी आरओचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच ज्या भागांमध्ये अद्याप पुराचे पाणी साचले आहे, त्या ठिकाणी नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचेही ओमकार पवार यांनी स्पष्ट केले.