कर्जामुक्ती लाभासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक : जिल्हाधिकारी

३३ हजार २७ शेतकरी पात्र

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
वर्धा,
farmers पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी तातडीने प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे.
 
 
 
ili
 
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा बँक व खाजगी बँकांकडून पीक कर्ज घेतलेले आणि ३१ मार्च २०२६ रोजी थकीत असलेल्या एक किंवा अनेक बँकांमधील कर्जाची मुद्दल अधिक व्याजासह एकत्रित रक्कम २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी प्रथम २ लाखांपेक्षा जास्त रक्कम परतफेड करणे आवश्यक आहे. त्यानंतरच २ लाखांपर्यंतचे ओटीएस कर्जमाफीचे लाभ मिळणार आहे. सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्ज घेऊन विहित वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार २७ शेतकरी सध्या पात्र ठरले आहेत. संदेश मिळालेल्या शेतकर्यांनी आधारकार्ड व ॲग्रीस्टॅक क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. सर्व ई-सेवा केंद्र चालकांना हे काम मोफत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आधार प्रमाणिकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
बँकस्तरावर ई-केवायसी न झालेल्या २८ हजार ३९५ कर्ज खात्यांची यादी चावडी, ग्रामपंचायत, तलाठी, सहायक निबंधक व बँक कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील शेतकर्यांनी त्वरित बँकेत जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ तातडीने मिळावा यासाठी आपले सरकार केंद्रावर आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.