हिंगणघाट,
accident-in-hinganghat : सातेफळ येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका जोत्स्ना खेमनाद रामटेके (५४) रा. हिंगणघाट या मोपेड गाडीने प्रशिक्षणाला जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज ३० रोजी दुपारी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा ’ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. असे असतानाही प्रशासनाने शिक्षकांना दुपारी २ वाजेपर्यंत आपली नियमित शाळा पूर्ण करून शासनाने आयोजित केलेल्या एसआयआर ट्रेनिंगला उपस्थित राहणे सक्तीचे केले होते. विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण एखाद्या मोठ्या शहरात वा सोयीच्या ठिकाणी आयोजित न करता चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात ठेवण्यात आले होते. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती आणि मुसळधार पाऊस सुरू असतानाही वेळेवर हजर राहणे बंधनकारक असल्याच्या प्रशासकीय दबावापोटी ज्योत्स्ना नरांजे या दुपारी २ वाजता शाळा आटोपून आपल्या दुचाकीने हिंगणघाटवरून चिंचोलीकडे जात होत्या. हिंगणघाट सोडल्यानंतर महामार्गावर मुसळधार पावसात त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला.
शासकीय कामांचा वाढता अतिरिक्त ताण आणि प्रशासनाच्या अवाजवी अटींमुळे एका कर्तबगार शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक व संतापजनक घटना येथील राष्ट्रीय महामार्ग १४४ कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील पुलावर घडली आहे. या ठिकाणी आतापर्यंत पाच ते सहा अपघाताच्या घटना घडल्या असून अनेकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे तरी प्रशासन गाढ निद्रेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.