केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोप सिद्ध होत नाहीत

- आरोपीला जामीन मंजूर : सत्र न्यायालयाचा निर्णय

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
accused-granted-bail : एखाद्या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध ठोस पुरावे उपलब्ध असणे गरजेचे आहे. केवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीसारखी व्यक्ती दिसत असली म्हणून त्याला आरोपी ठरविता येत नाही, असे निरीक्षण जिल्हा सत्र न्यायालयाने नोंदवून हुडकेश्वर पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यातील आरोपीला जामिन मंजूर केला. कुबेर अनिल पोहाणे (वय २१, रा. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे.
 
 
 
ngp
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर परिसरात राहणारी आठ वर्षीय मुलगी रस्त्यावर खेळत होती. सात जुलै रोजी आरोपी कबुर पोहाणे याने तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार होती. तक्रारीवरुन पोलिसांनी कुबेरविरुद्ध गुन्हा दाखल करुन ९ जुलैला अटक केली. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात होता. पीडित मुलीच्या जबाबानुसार ३० वर्षांचा व्यक्तीने गैरकृत्य केले. पोलिसांनी २१ वर्षीय कुबेर याच्यावर संशयाच्या बळावर अटक केली. कारण त्या परिसरात कुबेरची दुचाकी उभी होती. तसेच त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक युवक कुबेरसारखा दिसत होता. त्यामुळे संशयाच्या बळावर ही अटक करण्यात आली होती. ॲड. प्रणीत जयंत वैरागडे यांनी आरोपीचा जामीन अर्ज दाखल केला.
 
 
अर्जानुसार, आरोपी बीपीटी (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी) शिक्षण घेत असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नाही. आरोपीला केवळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली असून त्याचा गुन्ह्याशी थेट संबंध जोडणारा ठोस पुरावा उपलब्ध नाही. तसेच, तक्रार कथित घटनेनंतर तीन दिवसांनी दाखल झाल्याने त्या विलंबाचे समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आलेले नसल्याचाही दावा अर्जात करण्यात आला आहे. तपासासाठी आरोपीची कोठडी आता आवश्यक नसून तो न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करण्यास तयार असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे. बचावपक्षाचा दावा मान्य करीत जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी कुबेर पोहाणे याचा जामीन मंजूर केला.