मुंबई
anil parab शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार अनिल परब यांना पालिका अभियंत्याला मारहाण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जून २०२३ मध्ये वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाची शाखा पाडल्यानंतर घडलेल्या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयाने अनिल परब, माजी नगरसेवक सदानंद परब तसेच इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
मुंबई महापालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता (परिरक्षण) अजय पाटील यांना मारहाण झाल्याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अनिल परब आणि इतरांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे आणि धमकी देणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सदानंद परब यांच्यासह काही जणांना त्यावेळी अटकही करण्यात आली होती. मात्र, या खटल्याचा निकाल देताना मुंबई सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणाची anil parab पार्श्वभूमी जून २०२३ मधील आहे. वांद्रे येथील ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने ते पाडले होते. या कारवाईच्या निषेधार्थ अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी अनिल परब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेले होते. पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असतानाही कार्यालयावर कारवाई करणारे अधिकारी कोण होते, असा सवाल परब आणि त्यांच्या समर्थकांनी अधिकाऱ्यांना केला होता.
दरम्यान, मोर्चादरम्यान पालिकेचे काही कर्मचारी समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी बीएमसीचे सहाय्यक अभियंता अजय पाटील यांच्यावर हल्ला करून त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने निकाल देत अनिल परब, सदानंद परब आणि इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.