अर्जुनी मोरगाव,
wadegaon-cyclone : तालुक्यातील वडेगाव/बंध्या येथे बुधवारी 29 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजताच्या सुमारास आलेल्या जोरदार अतिवृष्टी व चक्रिवादळामुळे मोठे नुकसान झाले असून वादळाच्या तडाख्याने 97 घरे अंशत: तर दोन घरे पुर्णत: पडली. तर शेकडो वृक्षांसह विद्युत खांब कोलमडल्याने या भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. विशेष म्हणजे, वादळामुळे काही घरांवरील कवेलू उडून नागरिकांच्या अंगावर पडले, तर एका ठिकाणी घराची भिंत कोसळल्याने एकूण दहा जण जखमी झाले. जखमींना तातडीने केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कुरखेडा व गडचिरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जखमींमधे बाबुराव नैताम (65), महेंद्र नैताम (35), नंदशिला महेंद्र नैताम (32), अभिजीत महेंद्र नैताम (11), प्रांजली महेंद्र नैताम (13), संजय राजाराम ताराम (35), निमरीता संजय ताराम (10), प्रफुल संजय ताराम (7), गौरव विजय ताराम (15) व मंदा प्रकाश कोकोडे (60) यांचा समावेश आहे. अतिवृष्टी व चक्रिवादळाची इतकी तिव्रता होती की एक दोन मिनिटांमधे गावाची दुर्दशा झाल्याची माहीती सरपंच घनश्याम शहारे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 97 घरे अंशत तर बाबुराव नैताम व संजय ताराम यांची दोन्ही घरे पुर्णतः पडली आहेत. तर पुनाराम जगझापे यांचे शेतातील 33 सागवन झाडे व दोन बांबूची झाडे कोसळली. दरम्यान, वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने झाडे हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून याबाबत गोठणगाव वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकार्यांना सूचित करण्यात आले आहे. वादळामुळे गावात तसेच शेतांमध्ये अनेक ठिकाणी विद्युत खांब व वीजतारा तुटून पडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करत आहेत. वादळामुळे घरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अधिकार्यांसह कर्मचार्यांची हजेरी
चक्रीवादळ व झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, नायब तहसीलदार खुशाल कावळे, केशोरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन ढेकने, महावितरणचे कनिष्ठ अभियंता पवनकुमार चव्हाण, क्षेत्र सहाय्यक अशोक मेश्राम, ग्राम महसूल अधिकारी देवेंद्र बोरकर, विजय निमकर, ग्रामपंचायत अधिकारी विजय खुने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचार्यांनी गावात हजेरी लावली असून मदतकार्य करण्यात येत आहेत.