इंजिनिअरकडे 'कुबेराचा खजिना'!

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
पाटणा,
crime-branch-action : बिहारमधील सासाराम येथील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यपालक अभियंता अरविंद कुमार चौधरी यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी तेथील आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या अधिकाऱ्याच्या सहा वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले असून, तपासादरम्यान अथांग मालमत्तेचा पर्दाफाश झाला आहे.
 
 

patna
 
 
प्राथमिक तपासात आणि पडताळणीत संबंधित अभियंत्याने आपल्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा तब्बल ८५ टक्क्यांहून अधिक, म्हणजेच सुमारे १ कोटी १९ लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती बेकायदेशीरपणे जमवल्याचे समोर आले आहे. या ठोस माहितीच्या आधारे तपास यंत्रणेने कारवाई करत पटना, मुझफ्फरपूर, सासाराम, देहरी ऑन सोन आणि बांका जिल्ह्यातील विविध निवासस्थानांवर, तसेच शासकीय कार्यालयांवर एकाच वेळी धाडी टाकल्या.
 
या छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची नाणी, अत्यंत महागड्या घड्याळी, चांदीची भांडी आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सर्व संपत्तीचे अंतिम मूल्यांकन संपूर्ण तपास आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
 
सध्या तपास यंत्रणेकडून सर्व ठिकाणांची कसून पाहणी सुरू असून जप्त केलेल्या मालमत्तेची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, या संपूर्ण कारवाईबाबत संबंधित कार्यपालक अभियंत्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.