अनिल कांबळे,
नागपूर,
ayush-puglia-massacre : नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने कुश कटारिया हत्याकांडातील मुख्य आरोपीचा गळा चिरुन खून केला होता. राज्यात गाजलेल्या या हत्याकांडातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेमुळे लकडगंजमधील कुश कटारिया हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सूरज विशेषराव कोटनाके (२८) असे शिक्षा झालेल्या कैद्याचे नाव आहे.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात सूरज हा एका हत्यकांडात शिक्षा भोगत होता. दरम्यान, आयुष निर्मल पुगलिया याने कुश कटारिया या मुलाचे अपहरण करुन खून केल्याच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहाक शिक्षा भोगत होता. आयुष आणि सूरज यांच्यात नेहमी वाद होत होते. आयुष हा वारंवार घाण शिव्या देत असल्यामुळे त्याने कारागृह रक्षकाकडे तक्रार केली होती. त्यामुळे आयुषने सूरजला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे दोघेही एकमेकांचे पक्के वैरी झाले होते. ११ सप्टेंबर २०१७ रोजी सूरज कोटनाके याने मध्यवर्ती कारागृहाच्या बडी गोल परिसरात असलेल्या शौचालयाजवळ चमचा लपवून ठेवला होता. आयुष शौचास गेला असता सूरजने त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर चमच्याने त्याचा गळा चिरला. गंभीर जखमी अवस्थेत आयुषला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी सूरजवर हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला होता.
काय म्हणाले न्यायालय
न्यायालयाने आपल्या निर्णयात कारागृहासारख्या सुरक्षित ठिकाणी घडलेली हत्या अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे नमूद केले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांकडे सौम्यपणे पाहता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या निकालामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या गाजलेल्या कारागृह हत्याकांडाला अखेर न्यायालयीन पूर्णविराम मिळाला. आयुषच्या हत्याकांडाला वेगळे वळण लागल्यामुळे हे हत्याकांड राज्यभर गाजले होते, हे विशेष. सरकारी पक्षाकडून ॲड. श्याम खुळे यांनी बाजू मांडली.