गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेमार्गावर २४६ विशेष फेऱ्या

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
कोकण
central railway गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना मोठा दिलासा देत मध्य रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर २४६ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. मुंबई आणि पुण्यातील चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई, पुणे आणि दिवा येथून सावंतवाडी, रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि मडगाव या प्रमुख स्थानकांसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या अतिरिक्त फेऱ्यांमुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार असून, सणासुदीतील गर्दीचे प्रभावी नियोजन करण्यासही मदत होणार आहे.
 

ganesh festival trains, central railway, konkan railway, 246 special trains, memu trains, mumbai to konkan, ratnagiri train, savantwadi train, madgaon train, railway update, ganeshotsav, indian railways 
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एकूण २४६ विशेष गाड्यांपैकी १८४ मिश्र विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान तसेच सामान्य अनारक्षित डब्यांची सुविधा उपलब्ध असणार आहे. याशिवाय ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ६२ पूर्णपणे अनारक्षित मेमू विशेष गाड्याही चालविण्यात येणार आहेत. या विशेष सेवांमध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९८ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७६ फेऱ्या आणि पुणे येथून १० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, त्यापूर्वीच्या आठवड्यात लाखो चाकरमानी कोकणातील आपल्या गावी रवाना होणार आहेत. ही वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. रेल्वे आणि एसटीच्या आरक्षणाला वेग आला असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त तिकीट खिडक्यांचीही व्यवस्था करण्यात येत आहे.गणेशोत्सवानिमित्त सीएसएमटी-सावंतवाडी, एलटीटी-सावंतवाडी, दिवा-खेड मेमू, दिवा-चिपळूण आणि पुणे-रत्नागिरी या विशेष गाड्या विविध तारखांमध्ये चालविण्यात येणार आहेत. तसेच एलटीटी-मडगाव, रत्नागिरी आणि सावंतवाडी मार्गावर साप्ताहिक तसेच द्विसाप्ताहिक विशेष फेऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.दरम्यान, कोकणातील रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. २६ जुलैपासून सीएसएमटी-मंगळूरू एक्स्प्रेस आणि हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाड्यांचा सावंतवाडी रोड येथे अधिकृत थांबा सुरू झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २५ मार्च २०२४ रोजी केलेल्या विनंतीनंतर जनहिताचा विचार करून या थांब्यांना मंजुरी देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.