ठाकरे-शिंदेंना कोर्टाचा समन्स!

हजर राहण्याचे निर्देश

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
कल्याण,
Court summons Thackeray-Shinde शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान घडलेल्या वसंत डावखरे प्रकरणाशी संबंधित खटल्यात न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना ५ ऑगस्ट, तर एकनाथ शिंदे यांना ६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.हे प्रकरण २००९ मधील कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीशी संबंधित आहे. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात लढत झाली होती. २२ एप्रिल २००९ रोजी डोंबिवली येथे आनंद परांजपे यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी एक व्हिडिओ दाखवला होता. या व्हिडिओमध्ये वसंत डावखरे कार्यकर्त्यांना निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते.
 
 

Court summons Thackeray-Shinde 
 
मात्र, वसंत डावखरे यांनी हा दावा फेटाळून लावत संबंधित व्हिडिओतील मजकूर संपादित करून आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप केला. याप्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. दुसरीकडे, शिवसेनेने हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कल्याण न्यायालयाने आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना समन्स बजावले असून, त्यांच्या न्यायालयीन उपस्थितीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.