धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा अन्वयार्थ

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
दिल्ली वार्तापत्र,
श्यामकांत जहागीरदार,
dharmendra-pradhan : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांंच्या राजीनाम्यामुळे देशात अनेकांना हळहळ वाटली. धर्मेंद्र प्रधान मोदी सरकारमधील चौथे शिक्षण मंत्री होते. १२ वर्षांत मोदी सरकारमध्ये चार जणांनी शिक्षण मंत्री हे पद भूषवले. आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
 
 
 
JK
 
 
१९८५ ते २०२० पर्यंत या मंत्रालयाचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे होते. देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर या मंत्रालयाचे नाव बदलून ते शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले. स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल निशंक हे मानव संसाधन विकास मंत्री होते. त्या अर्थाने प्रधान यांना मोदी सरकारमधील पहिले शिक्षण मंत्री म्हणावे लागील. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात डॉ. मुरलीमनोहर जोशी हे देशाचे मानव संसाधन मंत्री होते. स्मृती इराणी या मोदी सरकारमधील पहिल्या मानव संसाधन विकास मंत्री होत्या, नंतर प्रकाश जावडेकर मानव संसाधन विकास मंत्री झाले, त्यांंच्यानंतर रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे या मंत्रालयाची जबाबदारी आली. विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असलेल्या आणि विद्यार्थी आंदोलनात आघाडीवर राहात असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळेच शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, हा काव्यात्मक न्याय म्हणावा लागेल.
 
 
विशेष म्हणजे प्रधान यांनी शिक्षण मंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. असा कार्यकाळ पूर्ण करणारे ते मोदी सरकारमधील पहिलेच शिक्षण मंत्री होते. स्मृती इराणी यांनी दोन वर्षे, प्रकाश जावडेकर यांनी तीन वर्षे तर पोखरियाल यांनी दोन वर्षे या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली.
 
 
देशातील नवीन शैक्षणिक धोरणाचे शिल्पकार आणि सूत्रधार म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचे नाव घ्यावे लागेल. नव्या शैक्षणिक धोरणाला मूर्त रूप देण्यात आणि त्यांची अंमलबजावणी घडवून आणण्यात शिक्षण मंत्री म्हणून प्रधान यांची मोठी भूमिका होती. योगायोग म्हणजे पेपरफूट प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी राजीनामा दिला असला तरी याच मुद्यावर त्यांनी विद्यार्थी नेते असताना आंदोलनही केले होते. १९९७ ची घटना आहे. प्रधान त्यावेळी अभाविपचे राष्ट्रीय मंत्री होते. पेपरफुटीच्या घटनेच्या विरोधात प्रधान यांनी ओडिशात मंत्रालयासमोर निदर्शने केलीत. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. यात प्रधान गंभीर जखमी झाले होते. मात्र आता तशाच आंदोलनाने त्यांना पायउतार व्हावे लागले.
 
 
जवळपास चार दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेले धर्मेंद्र प्रधान यांची कौटुंबिक पृष्ठभूमी राजकीय आहे. त्यांचे वडील देवेंद्र प्रधान जनसंघ आणि भाजपाचे नेते होते. देवेंद्र प्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही होते. शिक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्याआधी प्रधान यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कौशल्य विकास तसेच पोलाद मंत्रालयांचीही जबाबदारी सांभाळली.
 
२००० मध्ये ओडिशाच्या पल्लाहारा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जिंकत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. २०० ४ ची लोकसभा निवडणूक प्रधान यांनी ओडिशाच्या देवगड मतदारसंघातून लढवली आणि जिंकली. देवगड हा त्याच्या वडिलांचा- देवेंद्र प्रधान यांचा- मतदारसंघ होता. मात्र २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, २०१० मध्ये भाजपाने त्यांना राष्ट्रीय महासचिव बनवले. २०१२ मध्ये प्रधान यांना भाजपाने बिहारमधून राज्यसभेवर पाठवले. दोन कार्यकाळ राज्यसभेत राहिल्यानंतर २०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी ओडिशाच्या संबलपूर मतदारसंघातून लढवली आणि जिंकली. २००९ नंतर म्हणजे तब्बल १५ वर्षांनंतर ते लोकसभेत परतले.
 
 
सुरुवातीच्या काळात शिक्षण मंत्रालय अतिशय साधे समजले जात होते. प्राथमिक, माध्यमिक आणि काही प्रमाणात उच्च शिक्षणापर्यंत ते मर्यादित होते. पण देशात स्पर्धा परीक्षांचे युग सुरू झाल्यानंतर या मंत्रालयाचे महत्त्व वाढले. हे मंत्रालय अतिशय संवेदनशील झाले.
 
मौलाना अबुल कलाम आझाद हे देशातील पहिले शिक्षण मंत्री होते. त्यानंतर अनेक मान्यवरांनी आणि शिक्षणतज्ज्ञांनी या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. सर्वाधिक म्हणजे ११ वर्षे या मंत्रालयाची जबाबदारी अबुल कलाम आझाद यांनी सांभाळली. त्यांच्या खालोखाल डॉ. मुरलीमनोहर जोशी सहा वर्षे मानव संसाधन विकास मंत्री होते. प्रधान यांच्याआधी डॉ. के. एल. श्रीमाळी, प्रो. एस. नुरुल हसन, अर्जुनसिंह यांनी या पदावर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. नंतर पंतप्रधान झालेले विश्वनाथ प्रतापसिंह आणि पी. व्ही. नरसिंहराव यांनीही शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. आधी शिक्षण मंत्री असलेले फख्रुद्दिन अली अहमद नंतर देशाचे राष्ट्रपतीही झाले होते. अर्जुनसिंह आणि नरसिंहराव यांच्याकडे एकदा नाही तर दोनदा या खात्याची जबाबदारी आली. महाराष्ट्राचे शंकरराव चव्हाण यांनीही देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले.
 
 
कोणत्याही कारणाने राजीनामा द्यावा लागणारे धर्मेंद्र प्रधान हे मोदी सरकारमधील दुसरे मंत्री ठरले आहेत. २०१८ मध्ये मी टू आंदोलनादरम्यान लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यामुळे तेव्हा परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री असलेले एम. जे. अकबर यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र अकबर आणि प्रधान यांच्या राजीनाम्याच्या कारणात मोठा गुणात्मक फरक आहे.
शिक्षण मंत्रिपदावर असताना राजीनामा द्यावा लागलेले धर्मेंद्र प्रधान हे दुसरे मंत्री आहेत १९६७ मध्ये इंदिरा गांधी यांच्याशी व्यक्तिगत आणि राजकीय मुद्यांवरून मतभेद झाल्यामुळे तेव्हाचे शिक्षण मंत्री मोहम्मद करीम छागला यांनी राजीनामा दिला होता.
शिक्षणमंत्र्याने कोणत्याही राजकीय कारणामुळे अडचणीत येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेक शिक्षण मंत्री वेगवेगळ्या राजकीय कारणांनी अडचणीत आले होते. छागलानंतर त्रिगुण सेन हे शिक्षण मंत्री झाले. क्षेत्रीय भाषा विवादामुळे ते अडचणीत आले होते. विश्वनाथ प्रतापसिंह यांना मंडल आयोग आणि आरक्षण धोरणाचा फटका बसला होता. डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्याचर एनसीईआरटीच्या भगवेकरणाचा आरोप झाला होता. अर्जुनसिंह यांच्यावर ओबीसी आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप होता. कपिल सिब्बल यांना चार वर्षीय स्नातक अभ्यासक्रमाने अडचणीत आणले होते. स्मृती इराणी यांच्या काळातही रोहित वेमुला, जेएनयू आणि अलाहाबाद विद्यापीठातील काही घटनांनी वादळ निर्माण केले होते. रमेश पोखरियाल निशंक यांना नव्या शैक्षणिक धोरणाच्या मुद्यावरून घेरले होते.
नैतिक जबाबदारी घेत राजीनामा देणारे तीन मंत्री
 
 
पदावर असताना आतापर्यंत १० केंद्रीय मंत्र्यांना विविध कारणांवरून राजीनामा द्यावा लागला. नैतिक मुद्यावरून राजीनामा देणारे देशात आतापर्यंत तीन मंत्री झाले. यात लालबहादूर शास्त्री, नितीशकुमार आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. लालबहादूर शास्त्री आणि नितीशकुमार यांनी रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला होता. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी घेत ओडिशाचे लाल असलेल्या बहादूर धर्मेंद्र प्रधान यांनी आता राजीनामा दिला आहे. उर्वरित ७ मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या वा गैरवर्तनाच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळेच प्रधान यांच्या राजीनाम्याने सर्वसामान्य माणूस हळहळला आहे.
९८८१७१७८१७