समुद्रपूर,
drain-on-pipri-road-floods : गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरडकोरा मार्गावरील पिपरी बसस्थानकाजवळील दोन नाल्यांना पूर आल्याने गावाकडे जाणारा रस्ता बंद होता. पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थ अडकून पडले होते. रस्ता बंद असल्याने काहींना शेजारच्या गावात मुक्काम ठोकावा लागला.
पिपरी गावाकडे जाण्यासाठी हा एकमेव प्रमुख मार्ग असल्याने प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. नाल्यावरील पूर तीन ते चार तास कायम राहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. या ठिकाणी यापूर्वीही दुर्घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी एका युवकाने दुचाकीसह पूर ओलांडण्याचा प्रयत्न केला असता तो पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. तसेच अनेक जनावरेही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
नाल्याचा पूर येत असल्याने उंच पूल बांधण्याची मागणी सरपंच संघटनेचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विलास नवघरे सह ग्रामस्थांनी केली आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असून यंदा तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.