नागपूर,
female-cricketer-commits-suicide : राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतरही वरिष्ठ संघात निवड न झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या महिला क्रिकेटपटूने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास लक्ष्मीनगरात उघडकीस आली. आदिती मोरेश्वर चौखंडे (१९) असे मृत क्रिकेटपटूचे नाव आहे.

मूळची अकोला शहरातील असलेली आदिती ही ‘अंडर-१५ क्रिकेट’ स्पर्धेसाठी विदर्भ संघाकडून खेळली होती. अकोल्यात क्रिकेटचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ती नागपुरातील क्रिकेट अकादमीत प्रशिक्षणासाठी आली होती. तिचा भाऊ प्रज्वल हा सुद्धा क्रिकेटपटू आहे. त्याची निवड व्हिसीएसाठी झाली आहे. त्यांचे वडिल शासकीय कंत्राटदार असून ते अकोल्यात राहतात. आदिती ही आईसह लक्ष्मीनगर चौकात उमालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या माळ्यावर राहत होती. ती वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टीस करायला जात होती. शहरातील सुर्वे क्रिकेट अकादमीमध्ये ती क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती. व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्याचे तिचे स्वप्न होते. अलीकडेच झालेल्या व्हिसीएच्या निवड चाचण्यांमध्ये तिची निवड न झाल्यामुळे ती प्रचंड निराश आणि मानसिक तणावाखाली होती, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी मिळालेल्या हस्तलिखित चिठ्ठीत "माझी निवड झाली नाही" असा उल्लेख असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. "सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल," अशी माहिती बजाजनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार चेतन चौहान यांनी दिली.
तू पुढे जा...मी सोबतच आहे.
दादा...तुझी व्हिसीएसाठी निवड झाली. तू मोठा हो, पुढे जा. आपल्या आईवडिलांसह देशाचे नाव मोठे कर. तू पुढे जा. मी तुझ्या सोबतच आहे. मी तीन वर्षांपासून मेहनत घेत असून माझी निवड झाली नाही. त्यामुळे मी निराश आहे. आईवडिलांचा सांभाळ कर.’ असा उल्लेख आदितीने ‘सुसाईड नोट’मध्ये केल्याची माहिती पोलिसांनी दिली.