फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०२६ची नामांकने जाहीर

‘दशावतार’ २२ नामांकनांसह आघाडीवर

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
मुंबई
filmfare marathi awards मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ११वा फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा यंदा ६ ऑगस्ट रोजी मुंबईतील सहारा स्टार येथे पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची नामांकने मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. यावेळी फिल्मफेअरचे एडिटर-इन-चीफ जितेश पिल्लई आणि अभिनेत्री अमृता खानविलकर उपस्थित होते. यंदाच्या सोहळ्याचे सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ करणार असून हा पुरस्कार सोहळा लवकरच सोनी मराठीवर प्रसारित करण्यात येणार आहे.
 

filmfare marathi awards, filmfare marathi 2026, marathi cinema, dashavatar, ata thambaycha nay, gondhal, april may 99, amruta khanvilkar, siddharth chandekar, amey wagh, marathi movies, award nominations, entertainment news 
यंदाच्या नामांकनांमध्ये ‘दशावतार’ या चित्रपटाने सर्वाधिक २२ नामांकने मिळवत आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ ‘अता थांबायचं नाय!’ आणि ‘गोंधळ’ या चित्रपटांना प्रत्येकी १९, तर ‘एप्रिल मे ९९’ला १७ नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्तम चित्रपट या विभागात ‘एप्रिल मे ९९’, ‘अता थांबायचं नाय!’, ‘दशावतार’, ‘फसक्लास दाभाडे’, ‘जारण’ आणि ‘स्थळ – अ मॅच’ या चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) या विभागात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भारत जाधव, ललित प्रभाकर, अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर यांना नामांकन मिळाले आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) या विभागात रेणुका शहाणे, अमृता सुभाष, सई ताम्हणकर, हृता दुर्गुळे आणि साजिरी जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागात हेमंत ढोमे, जयंत दिगंबर सोमळकर, रोहन मापुसकर, ऋषिकेश के. गुप्ते, शिवराज वायचळ आणि सुबोध खानोलकर यांच्यात पुरस्कारासाठी स्पर्धा होणार आहे. समीक्षकांच्या सर्वोत्तम चित्रपट विभागात ‘देवमाणूस’, ‘गोंधळ’, ‘सबर बॉन्डा’, ‘स्थळ – अ मॅच’, ‘तीन पायांचा घोडा’ आणि ‘उत्तर’ या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक या विभागातही अनेक नवोदित दिग्दर्शकांना संधी मिळाली आहे.नामांकन घोषणेच्या वेळी अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी फिल्मफेअर पुरस्कार हा प्रत्येक कलाकारासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीचा भाग असल्याचा अभिमान वाटत असून यंदाच्या नामांकनांची घोषणा करताना विशेष आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी जितेश पिल्लई यांनी मराठी चित्रपटसृष्टीने सातत्याने दर्जेदार कथा, प्रभावी अभिनय आणि उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगत सर्व नामांकितांचे अभिनंदन केले. यंदाचा फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलावंत आणि चित्रपटांचा गौरव करणारा संस्मरणीय सोहळा ठरेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.