दुबईतून कट थायलंडमध्ये अपहरण; पाच भारतीय अटकेत

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
बँकॉक,
Five Indians arrested in Thailand थायलंडमध्ये तीन भारतीय पर्यटकांचे अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी खंडणी मागितल्याप्रकरणी पाच भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दुबईत वास्तव्यास असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाच्या सांगण्यावरून हा कट रचल्याची माहिती आरोपींनी चौकशीदरम्यान दिली आहे. परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना बँकॉकमधील क्लॉंग टॅन परिसरातील एका हॉटेलमधून गेल्या मंगळवारी या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांची ओळख ३८ वर्षीय अवतार सिंग, ३८ वर्षीय जगजीत सिंग, २४ वर्षीय रामबालक कुमार, ३७ वर्षीय सुखबीर सिंग आणि २७ वर्षीय कुलरा सिंग अशी झाली आहे. तपासादरम्यान आरोपींनी गेल्या महिनाभरापासून एका चॅट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून दुबईस्थित पाकिस्तानी नागरिकाशी संपर्क असल्याचे सांगितले. त्याच्याकडून तीन भारतीय पर्यटकांचे अपहरण करण्याच्या सूचना मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
 
 
indian
 
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, खंडणीची रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे स्वीकारण्याची योजना आखण्यात आली होती. तसेच अपहरणाची कारवाई पूर्ण केल्यानंतर आरोपींना मौल्यवान वस्तू, रोख रक्कम आणि थायलंडमधून बाहेर जाण्यासाठी विमानाची तिकिटे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पीडितांच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर २१ जुलै रोजी थायलंडमधील भारतीय दूतावासाने चोनबुरी इमिग्रेशन पोलीस आणि पटाया शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पटायामधील एका दोन मजली इमारतीवर छापा टाकला. या कारवाईत मोहित (२३), आशिष (२४) आणि हिमांशू (२०) या तीन भारतीय पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्यांनी प्रत्येक पीडिताच्या कुटुंबाकडे ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, दुबईस्थित पाकिस्तानी सूत्रधाराचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, यापूर्वी भारतीय नागरिक असल्याचे भासवणाऱ्या साहिल चौहानला थायलंडमध्ये अटक करून भारतात पाठविण्यात आले होते. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) त्याचा शोध घेत होती. परदेशातून सुपारी देऊन करण्यात आलेल्या अनेक हत्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.