अमरावती,
purna-dam-gates-opened : जिल्ह्यात २४ तासांपासून येत असलेल्या दमदार पावसामुळे मेळघाटातील सिपना व गडगा या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत व गावांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. वृत्त लिहिस्तोवर पाऊस सुरूच होता.
मेळघाटात चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने गडगा आणि सिपना नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रामुख्याने सेमाडोह ते चेथरपर्यंत सिपना नदी धोक्याच्या प्रवाहाने वाहत आहे. दिया गावालगतच्या सिपना नदीला प्रचंड पूर गुरुवारी होता. पुलाच्या वरच्या भागापर्यंत पाण्याने धडक दिल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. गडगा नदीत सुद्धा प्रवाह द्रुत गतीने या पावसाळ्यात प्रथमच वाढलेला होता. धारणी परिसरात पावसाने सरासरी गाठल्याने शेतकरी सध्यातरी सुखावलेला दिसत आहे. छोट्या छोट्या नाल्यांना पण पाझर फुटलेले आहे. जंगल बहरलेले आहे. चिखलदरा आणि घाटातील नैसर्गिक धबधबे आता ओसंडून वाहण्याच्या तयारीत आहेत.
जिल्ह्यातील अन्य भागांतही चांगला पाऊस झाला. मोर्शीतल्या काही शेतांमध्ये पाणी साचल्याची माहिती आहे. पाऊस खरीप पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे. सध्या पावसाने अपेक्षित सरासरी गाठलेली नाही. आणखी पावसाची गरज आहे. जिल्ह्यातले सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात ५२.३२ टक्केच जलसाठा आहे.