न्यूयॉर्क,
Hadi guilty in Salman Rushdie attack case प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर २०२२ मध्ये झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने २८ वर्षीय हादी मातर याला दहशतवादाशी संबंधित संघीय आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे. न्यू जर्सीतील फेअरव्ह्यू येथे राहणाऱ्या हादी मातरवर परदेशी दहशतवादी संघटना हिजबुल्लाहला मदत करण्याचा प्रयत्न, आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आणि दहशतवादाला सहाय्य केल्याचे आरोप सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.न्यूयॉर्कच्या वेस्टर्न डिस्ट्रिक्टचे अमेरिकन ॲटर्नी मायकल डिगियाकोमो यांनी सांगितले की, अमेरिकेत जन्मून आणि वाढूनही हादी मातरने इराणच्या कट्टर विचारसरणीचा स्वीकार केला होता. सलमान रश्दी यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या विचारांपासून तो प्रभावित झाला होता आणि त्यासाठी त्याने अनेक महिन्यांपासून नियोजन केल्याचा आरोप सरकारी पक्षाने मांडला.
तपासादरम्यान हादी मातरने स्वतः आदर्श मानत असलेल्या तथाकथित 'शहीदां'च्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला, असा दावा सरकारी वकिलांनी केला. मात्र, १२ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या हल्ल्यात सलमान रश्दी बचावले. १९८८ मध्ये प्रकाशित झालेल्या द सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीनंतर रश्दी यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या फतव्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचे तपासात समोर आले आहे.राष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागाचे सहाय्यक ॲटर्नी जनरल जॉन ए. आयझेनबर्ग यांनी सांगितले की, हादी मातर हा एक वर्षाहून अधिक काळ हिजबुल्लाहच्या हिंसक विचारसरणीच्या प्रभावाखाली होता. इराणच्या अयातुल्लांनी जारी केलेल्या फतव्याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने त्याने शांततापूर्ण व्याख्यान कार्यक्रमात सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेतून इराण-समर्थित दहशतवादाचा जागतिक प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचेही त्यांनी नमूद केले.