धारणी,
negligence-regarding-sir : धारणी विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत कथित हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मुख्याध्यापक सुनील काळे यांना निलंबित करण्यात आले. अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या स्वाक्षरीने २९ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

मतदार यादी पुनरिक्षणाच्या कामासाठी नियुक्त असताना सुनील काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना, आदेश व नोटिसा देऊनही कामात अपेक्षित प्रगती केली नसल्याचा आरोप आहे. मतदारांची घरभेट, एन्युमरेशन फॉर्म संकलन, माहितीचे डिजिटायझेशन आदी कामांमध्ये झालेल्या निष्काळजीपणामुळे निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेवर परिणाम झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या प्रकरणात यापूर्वी सुनील काळे यांच्याविरुद्ध धारणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शिक्षण विभागानेही स्वतंत्र प्रशासकीय कारवाई करीत त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले.निवडणूक प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असून, त्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा संदेश यातून देण्यात आला.
//हलगर्जीपणा भोवला
निवडणूक कामात झालेल्या हलगर्जीपणाची गंभीर दखल घेण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानुसार संबंधित मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही नियमानुसार केली जाईल.
वैभव लादे, गटशिक्षणाधिकारी