सरासरीवर मात! गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी दमदार

तीन तालुक्यांसह 17 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
गोंदिया, 
rain-in-gondia : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने यंदाची हंगामी सरासरी ओलांडली असून, गुरुवारी 30 जुलै रोजी अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः देवरी, सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव या तीन तालुक्यांसह जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे नद्या, नाले आणि लहान-मोठे ओढे दुथडी भरून वाहत असून, सखल भागात पाणी साचल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.
 
 
rain-in-gondia
 
 
पुष्य नक्षत्राच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात पाऊस दरदिवशी हजेरी लावत असताना गुरुवारी मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास पावसाने दमदार बॅटींग केली. शेतीसाठी हा पाऊस लाभदायक ठरत असला, तरी छोट्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक भागातील शेती पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागातर्फे गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घेण्यात आलेल्या नोंदीनुसार देवरी तालुक्यात 99.2 मिमी., अर्जुनी मोरगाव 104.3 मिमी., तर सडक अर्जुनी तालुक्यात 71.6 मिमी. पाऊस झाला असून अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यात विशेषतः जिल्ह्यातील सर्व 41 महसूल मंडळांपैकी 17 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ज्यामध्ये देवरी तालुक्यातील चिचगड, सिंदीबीरी व ककोडी या तिन्ही महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असताना ककोडी मंडळात विक्रमी 152.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, बोंडगावदेवी, अर्जुनी, महागाव, केशोरी, गोठणगाव, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, सडक अर्जुनी आणि कोसमतोंडी, तिरोडा तालुक्यातील तिरोडा, मुंडीकोटा, वडेगाव व ठाणेगाव त्यातच गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रात्री झालेल्या या पावसाने जुलै महिन्याचा बॅकलॉग भरून काढला असून जिल्ह्यात आजच्या तारखेपर्यंत सरासरी 594.3 मिमी पाऊस अपेक्षित असताना 631.2 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. ज्याची टक्केवारी 106.2 टक्के आहे.
 
 
तिरोडा अर्जुनी मोरगाव पिछाडीवरच
 
 
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावात गुरुवारी सर्वाधिक 104.3 मिमी पावसासह अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. तर तिरोडा तालुक्यातील सर्व चारही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. असे असले तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत हे दोन्ही तालुके सरासरीत पिछाडीवर आहेत.
 
 
महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच हवामान विभाग व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
- राजन चौबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, गोंदिया